Aalapini Nisal Shared A Video : सध्या दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक कलाकार मंडळी लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करत आहेत; तर कोणी स्वत:च्या हाताने फराळ बनवताना दिसत आहेत. अनेक जण सोशल मीडियावर याबद्दलचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत आहेत.

अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर दिवाळीनिमित्तचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. अशातच ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम आलापिनी निसळनेही इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामधून ती तिच्या हाताने चकल्या करताना दिसत आहे. आलापिनीने शेअर केलेल्या व्हिडीओमधून ती तिच्या आईबरोबर किचनमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली चकल्या बनवत असल्याचं दिसत आहे.

आलापिनीने बनवल्या चकल्या

आलापिनीने यावेळी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने तिच्या आईने सांगितल्यानुसार छान चकली बनवल्याचं दिसतं. तिच्यानंतर तिच्या आईनेही तिला चकली बनवून दाखवली. एकंदरीतच आलापिनी दिवाळीत घरी तिच्या आईला फराळ बनवायला मदत करत असल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळतं.

आलापिनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा ती तिचे फोटो, डान्स व्हिडीओ, गाण्यांचे व्हिडीओ वगैरे शेअर करत असते; त्यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग वाढत असल्याचं दिसतं. ती अनेकदा तिच्या कुटुंबीयांबरोबरचे फोटो व व्हिडीओही पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या आजीचा व्हिडीओ शेअर करत, त्यांना तिच्या आलापिनी या नावामागचा अर्थ काय आहे हे प्रेक्षकांना सांगायला सांगितलं होतं.

आलापिनी अभिनेत्री वल्लरी विराजबरोबरचेही डान्स व्हिडीओ अनेकदा पोस्ट करत असते. त्यांच्या व्हिडीओंना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. याव्यतिरिक्त आलापिनी तिचे कविता वाचनाचे, गाण्यांचे व्हिडीओही पोस्ट करत असते.

दरम्यान, आलापिनी शेवटची ‘नवरी मिळे हिटलरला’ या ‘झी मराठी’वरील मालिकेतून झळकलेली. यामध्ये तिने रेवती ही भूमिका साकारलेली. त्यानंतर ती दुसऱ्या कुठल्याही मालिकतून झळकली नाही, त्यामुळे आलापिनी पुढे कोणत्या माध्यातून आणि कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल हे पाहणं रंजक ठरेल.