Vallari Viraj Shares Dance Video: मालिकेत दिसणारे कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येतात. मालिकेत एकमेकांविरुद्ध दिसणाऱ्या या कलाकारांमध्ये खऱ्या आयुष्यात मात्र चांगली बॉण्डिंग असल्याचे पाहायला मिळते.
‘नवरी मिळे हिटलरला’ ही लोकप्रिय मालिका आहे. लीला ही या मालिकेतील नायिका आहे. तर दुर्गा ही नकारात्मक भूमिकेत दिसते. लीलाला घराबाहेर काढण्यासाठी तिने सुरुवातीपासून प्रयत्न केले आहेत. काही दिवसांपूर्वीच जेव्हा दुर्गा पायऱ्यांवरून पडली आणि तिला बाळ गमावावे लागले, तेव्हा या घटनेला लीला जबाबदार असल्याचे दुर्गाला वाटले.
वल्लरी विराज व्हिडीओ शेअर करीत म्हणाली…
दुर्गाचा पती किशोरदेखील एजे व लीलाच्या विरोधात दुर्गाच्या मनात गैरसमज निर्माण करत असतो. त्यामुळे दुर्गा व किशोर एकत्र येऊन एजे व लीलाला वेगळे करण्याचा प्रयत्न करीत असतात. नुकतीच एजेची पहिली पत्नी अंतरा जहागीरदारांच्या घरी आल्याचे पाहायला मिळाले. महत्वाचे म्हणजे, लीलाने तिला घरी आणले आहे.
या मालिकेत लीलाची भूमिका अभिनेत्री वल्लरी विराजने साकारली आहे. तर दुर्गाची भूमिका शर्मिला शिंदेने साकारली आहे. वल्लरी विराजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या ‘उनसे मिली नजर कि मेरे होश उड़ गए’ या गाण्यातील एका कडव्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचे हावभाव आणि डान्स स्टेप्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना वल्लरी विराजने लीला आणि दुर्गा समांतर जगात अशा आशयाची कॅप्शन दिली आहे.
या व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या दोघींचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “सुंदर”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “या मालिकेत भांडतात आणि इथं एकत्र नाचतात”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह! लीला, दुर्गा एकदम भारी”, एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही दोघी माझ्या आवडत्या अभिनेत्री आहात.”



चाहत्यांसह मालिकेतील सहकलाकारांनीदेखील या दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक केले आहे. भारती पाटील यांनी, “डान्सिंग क्विन्स, लव्ह यू”, असे लिहित कौतुक केले. तसेच आलापिनी, रुचिर, शीतल क्षीरसागर या कलाकारांनीदेखील या दोन्ही अभिनेत्रींचे कौतुक केले.
दरम्यान, नवरी मिळे हिटलरला ही मालिका संपणार असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेचे चाहते ही मालिका संपवू नका, असे वारंवार सोशल मीडियावर लिहित असल्याचे दिसत आहे. आता या मालिकेत अंतराच्या परत येण्याने ट्विस्ट आला आहे. त्यामुळे एजे आता अंतरा आणि लीला यांच्यापैकी कोणाला निवडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.