लीला व एजे ही लोकप्रिय जोडी आहे. त्यांच्यातील भांडणे असो व त्यांची प्रेमाची केमिस्ट्री ते नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla) मालिकेतील ही पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. आता ते एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे. नुकतेच ते काश्मीरला गेले होते. लीलाच्या हवे तसे प्रपोज करता यावे, तिच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून एजे तिला काश्मिरला घेऊन गेल्याचे पाहायला मिळाले. तिथे एजेने लीलासमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. तिच्यामुळे त्याच्या आयुष्यात बदल झाल्याचे म्हटले. मात्र, या ट्रीपदरम्यान लीलावर हल्ला झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर तो हल्ला एजेमुळे झाला, तसेच हा हल्ला एजेनेदेखील घडवून आणला असू शकतो असे आरोप त्याच्यावर केले जात होते.

एजेने सर्व गोष्टी स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली आहे. मात्र, तितक्यात महिलांसाठी काम करणाऱ्या स्त्रियांचा एक गट येतो. जो एजेविरूद्ध घोषणा देत आहे. त्यातील काहीजण एजेंवर शाई फेकण्याचा प्रयत्न करत आहेत. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये लीला तिथे येते व त्यांना थांबविते. आता ती पत्रकार व इतरांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसत आहेत. तिला प्रश्न विचारला जातो की तुमच्यावर हल्ला झाला हे खरं आहे का? त्यावर ती म्हणते, “हो. पण त्या हल्ल्याला पुढे करून तुम्ही माझ्या नवऱ्यावर जे आरोप करताय ना, ते खोटे आहेत.” तिला पुढे विचारले जाते की, तुम्हाला असे वाटत नाही का अभिराम जहांगीरदार तुम्हाला सुरक्षा पुरविण्यात कमी पडले? या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणते, “तुम्ही तुमच्या बायकोबरोबर सुट्ट्यांसाठी जाता तेव्हा सिक्युरिटी घेऊन जाता का? कशाच्या जोरावर तुम्ही त्यांना आरोपी ठरवताय? त्यांना जर मला मारायचचं असतं तर ते मला इथे घेऊन आलेच नसते. तिथेच मारून टाकलं असतं आणि तुम्हा कोणाला हे कळूही दिलं नसतं. पण त्यांनी असं केलं नाही. कारण त्यांचं माझ्यावर प्रेम आहे.” लीलाचे हे बोलणे ऐकून अभिरामच्या चेहऱ्यावर आनंद व अभिमान दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “लीला हिटलरची बाजू मांडणार”, अशी कॅप्शन दिली आहे. या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात. कधी दुर्गा व किशोर हे पती पत्नी लीला व एजेला वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. तर कधी सरस्वती, लक्ष्मी व दुर्गा या लीलाविरोधात प्लॅनिंग करतात. किशोरला एजेला उद्ध्वस्त करायचे आहे, त्यामुळे तो अनेकदा कट कारस्थान करताना दिसतो. आता लीलावर झालेला हल्ला नक्की कोणी केला आहे, एजे व लीला त्यांना शोधू शकणार का, किशोर पुढे काय करणार, दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती या लीलाविरोधात पुढे काय प्लॅन करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.