मुंबईचा स्पेशल वडापाव प्रत्येकाच्या आवडीचा असतो. यात महत्वाचा असतो तो म्हणजे बटाटावडा. आता हा बटाटावडा बनवण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत आणि रेसिपी असते. अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर त्यांच्या काही रेसिपींचे व्हिडीओ पोस्ट करत असतात. अशात आता सोशल मीडियावर सध्या ‘बिग बॉस’फेम निक्की तांबोळी आणि विनोदवीर समीर चौघुले यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी बटाटावडा कसा बनवायचा याची रेसिपी सांगितली आहे.

चमचमीत बटाटावड्याची रेसिपी सांगताना त्याला विनोदाची फोडणीसुद्धा दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निक्की आणि समीर चौघुले दोघेही त्यांच्या वेगळ्या पद्धतीने बटाटावडा कसा बनवतात हे सांगत आहेत. निक्की म्हणते, “सर्वात आधी बटाटे घ्या आणि तुम्हाला हवे तसे ते उकडून घ्या. त्यानंतर त्याची भाजी बनवणे तर फारच सोप्पं आहे. त्यात कांदे, आलं, लसूण, कोथिंबीर आणि भरपूर तिखट हे सर्व टाकून घ्या. या भाजीचे मस्त गोळे बनवून घ्या आणि बेसन पीठात कोटिंग करून तळून घ्या.

व्हिडीओमध्ये निक्कीसह समीर चौघुले यांनीदेखील बटाटावडा कसा बनवतात त्याची रेसिपी सांगितली आहे. मात्र, त्यांनी ही रेसिपी त्यांच्या विनोदी अंदाजात सांगितली आहे. तसेच हा पदार्थ बनवताना कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा त्यांनी अगदी विनोदी अंदाजात सांगितलं आहे. समीर चौघुले यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही कमेंट्सचा आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. निक्कीच्या एका चाहत्याने यावर लिहिलं “बाई… हा काय प्रकार”, तर आणखी एका चाहत्याने लिहिलं, “समीर दादा तुझे विनोद म्हणजे हसून हसून पोट दुखायला लागले.” तसेच अनेकांनी कमेंटमध्ये हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा नवा कोरा सिझन नुकताच सुरू झाला आहे. त्यातील पुढील एपिसोडमध्ये निक्की आणि समीरने सांगितलेली ही रेसिपी दिसणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. यातील सर्वच कलाकार प्रेक्षकांना नेहमी खळखळून हसवतात. समीर चौघुले यांनी यात आतापर्यंत संगीतकार, शिक्षक, शिवलीचे बाबा अशा विविध विनोदी भूमिका साकारल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस मराठी’फेम निक्की तांबोळीसुद्धा तिच्या या रेसिपीच्या व्हिडीओने चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घातल्यानंतर आता निक्की ‘सोनी टीव्ही’वरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.