अनेक मराठी कलाकार आता अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत व्यवसाय करत आहेत. श्रेया बुगडे, मृणाल दुसानिस, वल्लरी विराज, रेश्मा शिंदे, अमोल नाईक, तेजस्विनी पंडित, प्रसाद लिमये, दीपाली सय्यद, सई ताम्हणकर, महेश जाधव, अक्षया देवधर, अपूर्वा गोरे, आशिष पाटील अशा अनेक कलाकारांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आता या यादीत दिवंगत अभिनेते निळू फुलेंची मुलगी गार्गी फुले-थत्तेंचं नाव सामिल झालं आहे. मराठी मालिकाविश्वातून स्वेच्छा निवृत्ती घेऊन गार्गी फुले-थत्तेंनी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेतून अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते या घराघरात पोहोचल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर ही भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर गार्गी ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘शुभविवाह’ ‘इंद्रायणी’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकांमध्ये झळकल्या. अभिनय क्षेत्राबरोबरच राजकारणात गार्गी फुले सक्रिय झाल्या. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्या कार्यरत आहे. त्यानंतर आता मालिकाविश्वातून स्वेच्छा निवृत्ती घेऊन गार्गी फुले-थत्ते यांनी व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.

गार्गी यांनी स्वतःचं Solitude Holiday ट्रॅव्हलिंग अ‍ॅप लॉन्च केलं आहे. नुकताच या अ‍ॅप लॉन्चचा सोहळा पार पडला. Solitude Holidayच्या माध्यमातून आवडत्या कलाकारांबरोबर देश-विदेशात फिरायला मिळणार आहे. याबाबत ‘लेट्सअप मराठी’शी संवाद साधताना गार्गी फुले-थत्ते म्हणाल्या, “मुळात जशी अभिनयाची आवड होती, तशीच प्रवास आणि खाण्याची आवड होती. तसंच काहीतरी क्रिएटिव्ह करावं, हे सतत खदखदत होतं. अभिनयाचं काम सुरुच होतं. पण, मला नेहमी वाटतं की, कला क्षेत्रात असणाऱ्या लोकांकडे पैसे कमवण्याचा दुसरा स्त्रोत असावा. आता नुसता अभिनय आणि त्यासंदर्भात असलेल्या गोष्टी हे पुरत नाही. मग हे सगळं करत असताना मला जाणवलं की, प्रवास आणि खाण्याची आवड आहे तर त्यासंदर्भात काहीतरी केलं पाहिजे.”

“आपण स्वप्न खूप बघतो. पण पूर्ण करायला धाडस लागतं, आर्थिक पाठबळ लागतं. ते सुदैवाने मला मिळालं आणि Solitude Holiday अ‍ॅप सुरू केला. Solitude करण्यामागचा उद्देश हा आहे की, प्रत्येकाने गोड अनुभव घेऊन जावा. कदाचित कडू अनुभवदेखील येईल. आमच्याकडूनही चुका होती. पण चुकभूल द्यावी, घ्यावी. तो प्रवास करावा. आयुष्यात राहिलेल्या गोष्टी असतात ना, त्या प्रवासात आपणच आपल्याला सापडत जातो. तर Solitude म्हणजे एकांत. मला असं वाटतं की, Solitudeमधील टूरमधून एकांत मिळावा आणि माणूस म्हणून घडण्यात आमच्याकडून थोडासा हातभार लागावा.”

View this post on Instagram

A post shared by @solitudeholiday

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गार्गी फुले-थत्ते यांच्या Solitude Holidayच्या माध्यमातून अभिज्ञा भावे, ओम प्रकाश शिंदे, शुभांगी गोखले, सायली संजीव, आशुतोष गोखले यांच्याबरोबर देश-विदेशात पर्यटकांना फिरता येणार आहे. यासंदर्भातील अधिक माहिती गार्गी यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.