Nitish Chavan Post: ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून अजिंक्य व शीतल या जोडीला मोठी लोकप्रियता मिळाली. मालिकेतील अजिंक्य कधी सामान्य व्यक्ती म्हणून, तर कधी सैनिक म्हणून प्रेक्षकांना प्रेरणा देत राहिला. या मालिकेतील अजिंक्य ही भूमिका अभिनेता नितीश चव्हाणने साकारली होती.

‘लागिर झालं जी’ या मालिकेनंतर नितीश २०२४ मध्ये ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सूर्यादादाच्या भूमिकेतून त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

प्रेमळ, तितकाच कडक शिस्तीचा, बहि‍णींसाठी आणि त्यांच्या सुखासाठी काहीही करणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा, आपल्या माणसांवर मनापासून प्रेम करणारा सूर्यादादा प्रेक्षकांमधीलच एक झाला. आता लाखात एक आमचा दादा या मालिकेने नुकताच निरोप घेतला आहे. मालिका संपल्यानंतर नितीशने एक पोस्ट शेअर करीत, त्याची भूमिका, कामाचा अनुभव, तसेच त्याचे सहकलाकार यांबद्दलच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“तुझ्यामुळे बहिणींचं प्रेम…”

नितीशने लिहिले, “सूर्यकांत शंकरराव जगताप ऊर्फ सूर्यादादा तुमच्या सगळ्यांचा निरोप घेतोय. पण, सूर्या मित्रा तू या नितीशला खूप काही दिलंस. तू नवी ओळख दिलीस, नवी ऊर्जा दिलीस, नवं कुटुंब दिलंस. गोड बहिणी दिल्यास. तू खूप काही शिकवलंस रे.”

पुढे त्याने लिहिले, “मला सख्खी बहीण नसल्यामुळे बहिणीची जबाबदारी, तिचं आयुष्य, जग, तिला कसं सांभाळायचं असतं हे काहीच माहीत नव्हतं. हे सगळं तुझ्यामुळे कळलं. तुझ्यामुळे बहिणींचं प्रेम मिळालं. भाऊ-बहिणीचं नातं जवळून अनुभवता आलं. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल सूर्या मित्रा खरंच मी तुझा मनापासून आभारी आहे.”

गिरीश ओक यांना उद्देशून अभिनेत्याने लिहिले, “सर, तुम्ही मित्रासारखे राहिलात म्हणून आम्ही मोकळेपणाने काम करू शकलो.” मालिकेत त्याच्या बहि‍णींच्या भूमिका साकारणाऱ्या कोमल मोरे, ईशा संजय, जुई तानपुरे व समृद्धी साळवी या अभिनेत्रींसाठी त्याने लिहिले, “पाच बोटं जुळतात तेव्हा मूठ तयार होते आणि ताकद येते. माझ्या गोड बहिणींनो, तुम्हा चौघींशिवाय हा सूर्या नाहीये हे कायम लक्षात असू द्या. तुम्ही चौघीसुद्धा खरंच खूप टॅलेंटेड आहात. तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम. छान छान कामं करा.”

मालिकेत काजू व पुड्या या भूमिका साकारणारे अभिनेते महेश जाधव व स्वप्नील कणसे यांच्यासाठी नितीशने लिहिले की, माझ्या व्यवसायात, कुटुंबात आणि आयुष्यात वेळोवेळी तुमची साथ लाभली. तुम्ही माझे आधारस्तंभ आहात. खूप खूप प्रेम!

मालिकेत नकारात्मक पात्र साकारणारा अभिनेता अतुल कुडाळेबद्दल नितीशने लिहिले, “तू ऑनस्क्रीन शत्रू असलास तरी चांगला मित्र झालास आणि तुझ्या अभिनयातून उत्तम खलनायक उभा केलास. असंच काम करीत राहा. लव्ह यू.”

धनश्रीच्या नवऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता शुभम पाटील याला उद्देशून त्याने लिहिले, “दाजीबा, तुम्ही प्रेमानं खोबऱ्याची बर्फी आणायचा, ती आयुष्यभर लक्षात राहील. खूप प्रेम भावा”

पुढे नितीशने त्याच्या पोस्टमध्ये मालिकेचे दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञान विभागात काम करणारे, झी मराठी अशा सर्वांचे आभार मानले आहेत. या मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्याला पुन्हा एकदा झी मराठीच्या कुटुंबाचा भाग होता आले. नितीशने त्याच्या सर्व सहकलाकारांप्रतिही कृतज्ञता व्यक्त केली आहे.

नितीशने याच पोस्टमध्ये प्रेक्षकांप्रतिदेखील कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याने लिहिले, “मायबाप रसिक प्रेक्षकहो, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही सूर्यावर, बहिणींवर, जगताप कुटुंबावर आणि मालिकेतल्या सर्व कलाकारांवर भरभरून प्रेम केलंत. त्याबद्दल तुमचा आभारी आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्यात.” ही पोस्ट शेअर करताना त्याने सहकलाकारांबरोबरचे काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत.

शेवटी त्याने नव्या भूमिकेत भेटूयात, असेही लिहिले आहे. आता प्रेक्षकांचा लाडका सूर्यादादा म्हणजेच नितीश चव्हाण कोणत्या भूमिकेतून आणि कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.