Zee Marathi Paaru Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पारू’ गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेत पारू आणि आदित्यचं नातं दिवसेंदिवस बहरत जात असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, हे दोघं लग्नबंधनात केव्हा अडकणार? पारू अहिल्याची सून केव्हा होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण आता मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे.

पारू आणि आदित्यच्या नात्याला मान्यता मिळावी म्हणून गेले कित्येक महिने प्रेक्षक वाट पाहत होते. तो दिवस आता फार लांब नाही. पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र पाहून आदित्य गोंधळलेला आहे. त्याच्या मनात अनेक विचार सुरू होतात. खोट्या लग्नाच्या आठवणी, पारूचं निस्वार्थ प्रेम आणि दिशाचे टोमणे या सगळ्या गोष्टी आदित्यच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करतात. या भावनिक गोंधळात पुन्हा एकदा पारूशी खरं लग्न करण्याचा धाडसी निर्णय आदित्य घेणार आहे.

‘पारू’चा त्याच्यावरचा विश्वास, तिचं समर्पण या सगळ्या गोष्टी पाहून आदित्य पारूच्या नि:स्वार्थ प्रेमाला काही करून न्याय द्यायचा आणि सर्वांसमोर तिचं बायको म्हणून स्थान निर्माण करायचं असं ठरवतो. मालिकेत सध्या देवीच्या उत्सवाचा सीक्वेन्स सुरू आहे. गुरुजी संपूर्ण गावाला आमंत्रण देतात, आणि त्याचवेळी दामिनी आग्रह करते की मुख्य पूजेसाठी दिशा ‘नववधू’ म्हणून पुढे यावी. पण, आदित्य या गोष्टीला विरोध करतो यावरून दिशा व आदित्यमध्ये वाद सुरु होणार आहे.

पारू आपल्या गळ्यातील मंगळसूत्र हे खोट्या लग्नाचं प्रतीक असल्याचा कबुलीजबाब गुरुजींसमोर देणार आहे. पण, गुरुजी तिला थांबवतात आणि “हे मंगळसूत्र म्हणजे आदित्यच्या आयुष्याचं कवच असल्याचं सांगतात.” तर दुसरीकडे, आदित्यच्या सुरक्षिततेसाठी अहिल्या एक पवित्र यज्ञ करायचं ठरवते. या देवीच्या उत्सवातच, गुरुजी सर्वांसमोर आदित्य आणि पारूचं विधीवत लग्न लावून देणार आहेत, हा एक दिव्य संयोग आहे. दिशा आणि दामिनी पुन्हा एकदा अहिल्यावर मानसिक खेळी खेळायचा प्रयत्न करणार आहेत, पण यावेळी नियतीचं बळ त्यांच्या प्रत्येक पावलाला रोखेल. अहिल्या यज्ञ पूर्ण करते आणि त्या पवित्र क्षणी आदित्य आणि पारू एकत्र येऊन गुरुजींचा आशीर्वाद घेतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता आदित्य आणि पारूच्या नात्याकडे अहिल्या कोणत्या दृष्टीकोनातून पाहणार? त्यांच्या नात्याचा स्वीकार मारुती करेल का? हे पारू मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे. ही मालिका रोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाते.