Paaru Serial : ‘पारू’ मालिकेत सध्या पारू आणि आदित्यचं प्रेम दिवसेंदिवस बहरत जात असल्याचं पाहायला मिळत आहे. भव्यदिव्य सजावट करून आदित्य पारूला प्रपोज करतो, तिला लग्नाची मागणी घालतो. पारू या सगळ्या गोष्टी पाहून भारावून जाते अन् तिचंही आदित्यवर प्रेम असल्याची कबुली देते.
मात्र, पारू-आदित्यच्या प्रेमाचा प्रवास वाटतोय तेवढा सोपा नक्कीच नाहीये. कारण, त्या दोघांबद्दल अद्याप अहिल्यादेवींना काहीच माहीत नाहीये. अहिल्याचा पारूवर प्रचंड विश्वास असतो त्यामुळे ती पेपरमध्ये आलेल्या पारू-आदित्यच्या रोमँटिक फोटोकडे सुद्धा दुर्लक्ष करते. आता लवकरच या दोघांचं नातं प्रियासमोर उघड होणार आहे. याशिवाय पारूच्या आयुष्यात आणखी संकट येणार आहे.
पारूचा भयंकर भूतकाळ पुन्हा एकदा तिच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहणार आहे. मालिकेत अजयची रिएन्ट्री होणार आहे. ही भूमिका अभिनेता सचिन देशपांडे साकारत आहे. अजयने आधीच पारूशी गैरवर्तन केलेलं असतं आणि आता तो नवीन मुलीला फसवणार असतो. “पुढच्या आठवड्यात आपण न्यूझीलंडला जाऊयात…तिकडे आपला सुखाचा संसार करू” असं तो त्या मुलीला सांगणार आहे. या सगळ्या गोष्टी ऐकून पारू लगेच येते आणि अजयला जाब विचारते.
पारू अजयची कॉलर धरून त्याला विचारते, “तू अजून तुझे घाणेरडे धंदे सोडलेले नाहीयेस का?” यानंतर अजय समोरच्या मुलीला पारूबद्दल भडकवण्याचा प्रयत्न करतो आणि सांगतो, “हिच्या घरच्यांनी मला फसवलं आणि आमचं लग्न ठरवलं. पण, तेव्हा मला माहिती नव्हतं की, ही असे कपडे घालणारी अशिक्षित मुलगी आहे.” अजयचा हा खोटेपणा ऐकून पारू प्रचंड संतापते आणि न डगमगता त्याला सणसणीत कानाखाली वाजवते.
‘पारू’ने अजयला कानाखाली मारल्यावर आदित्य सुद्धा तिथे पोहोचतो आणि पारूला वेळीच सावरतो. आता अजयच्या येण्याने आदित्य-पारूचं आयुष्य कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘पारू’ मालिकेचा हा विशेष भाग ३ आणि ४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.