पारू व आदित्य यांची मैत्री प्रेक्षकांना भारावून टाकते. ‘पारू’ (Paaru) या मालिकेतील ही पात्रे प्रेक्षकांची लाडकी असल्याचे पाहायला मिळते. आदित्यवर जेव्हा जेव्हा संकट येते, त्या त्या वेळी पारू त्याच्या मदतीला धावून जाते. याबरोबरच आदित्यदेखील पारूच्या मदतीला धावून जाताना दिसतो. पारू जरी किर्लोस्करांच्या घरी काम करीत असली तरी ती त्यांच्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर व पारू यांच्यात खास बॉण्डिंग असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते. अहिल्यादेवी किर्लोस्कर ही यशस्वी उद्योजक आहे. घरातील बहुतांश निर्णय ती घेत असते. तिला तिच्या मुलासाठी म्हणजेच आदित्यसाठी तिच्यासारखीच सून हवी आहे. आता अनुष्काच्या रूपाने तिचे हे स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्यात पारू आदित्यच्या प्रेमात पडली आहे. आता तिच्या आयुष्यात नवे वळण येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आदित्यच्या लग्नाची पत्रिका आली समोर

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, किर्लोस्कर कुटुंब एकत्र आहे. श्रीकांत, दामिनी, अहिल्यादेवी, सावित्रीआत्या, आदित्य यांबरोबरच अनुष्कादेखील त्यांच्याबरोबर आहे. आदित्य पारूला म्हणतो, “आई, दामिनीकाकू म्हणत होती की पारू हे सरप्राइज देणार आहे.” तितक्यात पारू तिथे येते. तिच्या हातात एक बॉक्स पाहायला मिळतो. तो बॉक्स ती अहिल्यादेवी किर्लोस्करला देत असते; पण, अहिल्यादेवी तिला म्हणते, “पारू, तूच उघड हा बॉक्स.” तिच्या या बोलण्यावर पारू होकारार्थी मान हलवते आणि बॉक्स उघडते. ती म्हणते, “देवीआई हा कसला तरी लखोटा आहे.” अहिल्यादेवी तिला म्हणते, “वाच तो.” पारू तो लखोटा उघडते आणि वाचते. तो असा, “श्री कृपेवरून आमच्या येथे आमचे चिरंजीव आदित्य व चि. सौ. का. अनुष्का यांचा शुभविवाह”. इतकेच ती वाचते. ही लग्नपत्रिका वाचल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर निराशा दिसत आहे. आदित्यदेखील गोंधळात पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर इतरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

या प्रोमोला ‘पारूच्या हातात येणार आदित्य आणि अनुष्काची लग्नपत्रिका…?’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

पारू या मालिकेत दाखिवल्याप्रमाणे, आदित्य व पारू यांनी एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये एकत्र काम केले होते. त्यावेळी आदित्यने पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते. पारूने ते लग्न समजून, आता ती आदित्यला नवरा मानत आहे. स्वत:ला किर्लोस्करांच्या घरातील मोठी सून समजत, ती सर्व कर्तव्य पार पाडते आहे. किर्लोस्करांच्या प्रत्येक संकटात ती धावून जाते. मात्र, काही दिवसांपूर्वीच किर्लोस्करांच्या आयुष्यात अनुष्का आली. हुशार, कर्तृत्ववान, संयमी, ठाम असणारी, धाडसी, यशस्वी उद्योजक असणारी अनुष्का सर्वांनाच आवडली. आदित्यसाठी हीच मुलगी योग्य असल्याचे मानत अहिल्यादेवी किर्लोस्करने अनुष्का-आदित्यचे लग्न ठरवले आहे.

हेही वाचा: श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’ ते माधुरी दीक्षितचा ‘भूल भुलैया ३’; जाणून घ्या २०२४ मधील हिंदी टॉप ५ चित्रपटांची यादी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता आदित्यच्या प्रेमात पडलेल्या पारूच्या हातात अनुष्का-आदित्यच्या लग्नाची पत्रिका आली आहे. ही लग्नपत्रिका वाचल्यानंतर पारूची प्रतिक्रिया काय असणार, आदित्यसुद्धा पारूच्या प्रेमात पडणार का, अनुष्का तिची बहीण दिशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आली आहे, हे किर्लोस्कर कुटुंबियांना समजणार का, मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.