Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी नाव विचारत गोळीबार केला, या घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील देखील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. या घटनेचा तीव्र निषेध म्हणून बॉलीवूडसह मराठीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आहे. शिवाय याबद्दल कठोर पावले उचलण्यासाठी सरकारला विनंतीही केली आहे.
पहलगाममध्ये हल्ला झाल्यापासूनच या घटनेसंबंधित अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हृदय पिळवटून टाकणारी अशी ही या घटनेची दृश्ये आहेत. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. अनेक वृत्तप्रसार माध्यमांकडून मृतांच्या घरी जात त्यांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात आहेत आणि या प्रतिक्रिया व मुलाखतींचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. याच मुलाखतींबद्दल मराठी अभिनेत्रीने शिवानी सुर्वेने भाष्य केलं आहे.
अभिनेत्री शिवानी सुर्वेने याबद्दल आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “लोकांनी, विशेषतः मीडियाने थोडा विचार करावा. सतत पीडितांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मुलाखती घेणं, पुन्हा पुन्हा तेच विचारणं, एका मागोमाग एक मुलाखती पोस्ट करणं थांबवलं पाहिजे. हे काही टीव्ही शो नाही. हे एखाद्या चॅनेलचा टीआरपी वाढवण्याचं साधन नाही.”

यापुढे तिने म्हटलं आहे की, “मीडियाने थोडं शहाणपण वापरावं. ज्यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे, त्यांना शांतपणे श्वास घेऊ द्या. त्यांच्या आयुष्यात जे घडलं आहे ते फार वेदनादायक आहे. आपण त्यांच्या दुःखाचा सन्मान केला पाहिजे. त्यांना त्रास देणं बंद केलं पाहिजे.” त्यामुळे मीडियाकडून सतत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतींबद्दल शिवानीने स्पष्ट शब्दांत तिचं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, स्वप्नील जोशी, शरद केळकर, सुबोध भावे, आदीनाथ कोठारे, सायली संजीव, मृण्मयी देशपांडे, तेजस्विनी पंडीत, तेजश्री प्रधान, सौरभ गोखले, समीर परांजपे, प्रसाद खांडेकर यांसह अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच भावुक होत श्रद्धांजलीही वाहिली आहे.