Actor Ashish Kapoor Arrested: टीव्ही अभिनेता आशिष कपूरला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीतील एका हाउस पार्टीदरम्यान आशिषने बाथरूममध्ये अत्याचार केला, असा आरोप महिलेने केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
उत्तर दिल्लीचे डीसीपी राजा बांठिया यांनी आशिष कपूरला बुधवारी पुण्यात अटक करण्यात आल्याची पुष्टी केली. पोलीस म्हणाले, गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आरोपीला मागोवा घेतला. आधी गोवा आणि नंतर पुण्यात अटकेसाठी पथकं पाठवण्यात आली. अखेर त्याला पुण्यातून अटक करण्यात आली. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने सुरुवातीला आरोप केला होता की आशिष कपूर आणि त्याच्या घरी पार्टी आयोजित करणारा मित्र, तसेच इतर दोन अनोळखी पुरूषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. एका महिलेने शारीरिक छळ केल्याचाही तिने दावा केला होता. नंतर महिलेने आरोप केला की फक्त आशिष कपूरनेच तिच्यावर बलात्कार केला.
बलात्काराचा व्हिडीओ शूट करण्यात आला होता, असा आरोप महिलेने केला आहे. पण आतापर्यंतच्या तपासात व्हिडीओ सापडलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष कपूर व त्या महिलेची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. नंतर त्याने तिला एका मित्राच्या घरी पार्टीसाठी बोलावलं आणि तिथे ही कथित घटना घडली.
११ ऑगस्ट रोजी आशिष कपूर, त्याचा मित्र, त्याच्या मित्राची पत्नी आणि दोन अनोळखी पुरुषांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला, असं पोलिसांनी सांगितलं. १८ ऑगस्टला महिलेने जबाबात म्हटलं की आशिष व त्याच्या मित्राने बलात्कार केला आणि महिलेने तिला मारहाण केली.
आशिष कपूरच्या मित्राने आणि त्याच्या पत्नीने २१ ऑगस्ट रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, तो मंजूर करण्यात आला. सुनावणीदरम्यान पीडिता उपस्थित होती. नंतर अर्जातून आशिषच्या मित्राचे नाव वगळण्यात आले.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार, पीडिता आणि आशिष कपूर पार्टी सुरू असताना बाथरूममध्ये गेले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने आशिषचा मित्र व इतर काही जण दरवाजा ठोठावू लागले. त्यानंतर या सर्वांमध्ये वाद झाला. सोसायटीच्या गेटपर्यंत त्यांचे भांडण सुरू होते. इथेच आशिषच्या मित्राच्या पत्नीने तिला मारहाण केली, असा दावा पीडितेने केला. तर आशिषच्या मित्राच्या पत्नीनेच पोलिसांना फोन केला होता, असं पोलिसांनी सांगितलं.