Apurva Nemlekar Emotional Post: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सावनी अर्थात अपूर्वा नेमळेकर नेहमी चर्चेत असते. या मालिकेतील तिने साकारलेली सावनी आता घराघरात पोहोचली आहे. नुकतीच अपूर्वाने भावाच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दोन वर्षांपूर्वी १४ एप्रिलला अपूर्वा नेमळेकरचा भाऊ ओमकारचं निधन झालं होतं. वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली. आज ओमकारच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अपूर्वाने त्याच्या आठवणीत भावुक पोस्ट लिहिली आहे.
अपूर्वा नेमळेकरची पोस्ट वाचा…
१४ एप्रिल…या दिवसाने सर्वकाही बदलून टाकलं. आजच्या दिवशी मी फक्त माझा धाकटा भाऊच नाही तर माझ्या आत्म्याचा एक भाग गमावला; ज्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ओमकार, असा एक दिवस गेला नाही जेव्हा तुझी आठवण आली नाही. मी दररोज सकाळी उठते आणि विचार करते की, त्या दिवशी नियतीने थोडीशी दया दाखवली असती तर…जर मी तो दिवस बदलू शकले असते तर…१४ एप्रिल २०२३ हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस.
वयाने लहान होतास तरी, तू माझा मार्गदर्शक, माझा सर्वात चांगला मित्र, टीकाकार आणि खूप शहाणा होतास. तू माझा आधारस्तंभ होतास. ज्याच्याकडे मी सर्वात साध्या आणि सर्वात गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं शोधू शकले असते. तू भावापेक्षा जास्त काहीतरी होतास. तू माझा साथीदार होतास. माझी सुरक्षित जागा होतास.
गेल्या दोन वर्षांत मी खूप काही गमावलं आहे. असे असंख्य क्षण आले, जिथे तू असायला हवा होतास. हसणं, चिडवणं, सल्ला देणं, फक्त तू असायला हवा होतास. आयुष्य पुढे गेलं आहे, पण मी अजूनही तिथेच आहे. मला वाटतं नाही की, मी कधीही पुढे जाऊ शकेन.
मी काहीही करू न शकल्याची अपराधी भावना त्रास देते आणि ती सतत मनात राहते. दिवसेंदिवस माझ्या मनावर याचा भार वाढत आहे. मला अपेक्षा आहे की, तू जिथे कुठे असशील, तिथे शांती आणि प्रकाशमय वातावरण असेल. पण इथे, तुझी गैहजेरी ही एक वेदनादायक आहे, जी मी शांतपणे सहन करते. मला तुझी खूप आठवण येते…अप्पू
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, अपूर्वा नेमळेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘आभास हा’ मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील तिची शेवंताची भूमिका सुपरहिट झाली. शेवंताच्या भूमिकेमुळे अपूर्वा अधिक प्रसिद्धी झोतात आली. नंतर ती ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत पाहायला मिळाली होती. मग तिने ‘बिग बॉस मराठी’चं चौथ पर्व गाजवलं.