Premachi Goshta fame Swarda Thigales Car Accident: ‘प्रेमाची गोष्ट’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत मुक्ता या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा ठिगळे दिसत आहे. अभिनेत्रीच्या अभिनयाचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते. आता मात्र अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली.
स्वरदाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये वटपौर्णिमेचा महासंगम शूट करणे तिला महागात पडल्याचे वक्तव्य तिने केले आहे. ती असे का म्हणाली हे जाणून घेऊ…
स्वरदाने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत तिच्या गाडीला अपघात झाल्याचे सांगितले आहे. अभिनेत्री म्हणते, “आता सकाळचे ६ वाजलेत. पहाटे साडेपाच वाजता माझ्याबरोबर किस्सा घडला आहे.” पुढे अभिनेत्री गाडीचे फुटलेले हेडलाइट दाखवत म्हणते की, हेडलाइट, चाक गेलं आहे. गाडीचा दरवाजा उघडत नाहीये.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट‘ या मालिकेत करते. काल सकाळी ७ च्या शिफ्टला काम सुरू केलं आहे, आज पहाटे ५ वाजता माझं पॅकअप झालं आहे. चांदिवली स्टुडिओवरून मढला ही गाडी चालवत आली आहे. मला झोप लागली. मी पेंगत होतं. कारण- मी प्रचंड थकले होते. कारण- सकाळी ७ वाजल्यापासून आम्ही जे शूट करतोय, ते सकाळी ५ वाजेपर्यंत शूट करीत होतो.
माझं हे मोठं नुकसान झालेलं आहे. हा महासंगम शूट करणं मला फार महागात पडलं आहे. आता मला कितीचा फटका बसणार आहे, याची मला कल्पना नाही; पण मी कृतज्ञ आहे की, माझ्या जीवावर बेतलं नाही. मोठा अपघात झाला नाही, यासाठी मला बरं वाटत आहे.”
पुढे अभिनेत्रीने, “माझी सहकलाकारांना विनंती आहे की, तुम्ही असं करू नका. मला कळलं आहे की, भविष्यात मला काय करायचं नाही. तुम्ही यातून काहीतरी शिका. तुम्ही तुमच्या जीवाशी खेळू नका. काम होत राहिलं; पण तुमचा जीव महत्त्वाचा आहे, हे एवढंच मला सांगायचं आहे”, असे व्हिडीओ शेअर करताना हा अपघात जीवावर बेतला नसल्याचे सांगितले. तसेच, सहकलाकारांनीदेखील काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्व मालिकांतील नायिका एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. आता या महासंगममध्ये काय़ होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.