Raj Babbar on Smita Patil: दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान मोठे आहे. त्यांनी ‘निशांत’, ‘भूमिका’, ‘मंथन’, ‘चक्र’, ‘शक्ती’, ‘आक्रोश’, ‘उंबरठा’, ‘दर्द का रिश्ता’, ‘अमृत’, ‘मिर्च मसाला’, ‘अनोखा रिश्ता’, ‘आज की आवाज’, ‘कसम पैदा करने वाले की’ अशा अनेक चित्रपटांतून काम केले आहे.

स्मिता पाटील यांची दिग्गज कलाकारांमध्ये गणना होते. त्यांच्या अभिनयाबद्दल आजही बोलले जाते. चाहत्यांच्या मनात आजही त्यांच्याबद्दल प्रेम असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते.

१७ ऑक्टोबर १९५५ रोजी जन्मलेल्या स्मिता पाटील यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत अनेक चित्रपटांत काम केले, जे प्रचंड गाजले. त्यांच्या भूमिकांची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटली. त्यांच्या जयंतीनिमित्त राज बब्बर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज बब्बर काय म्हणाले?

राज बब्बर यांनी लिहिले, “स्मिताने जाणीवपूर्वक तिच्या चित्रपट प्रवासाचा वापर बदल घडवून आणण्यासाठी केला. तिने साकारलेल्या भूमिकांनी समाजाने घालून दिलेल्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे आणि रूढीवादी कल्पनांना मोडून काढण्याचे धाडस केले. गुंतागुंतीच्या भूमिकांमधील तिची सहजता आणि आपल्या सामाजिक रचनेतील पात्रांबद्दलची तिची सखोल समज यांमुळे ती इतर कलाकारांहून वेगळी आहे, हे जाणवते. नियतीने दिलेल्या अल्पावधीत तिने खूप काही साध्य केले. ती खूप कमी काळ जगली, ही कायमच तक्रार असेल.”

राज बब्बर यांच्यासह मुलगा प्रतीकनेदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. प्रतीक त्याच्या नावापुढे राज बब्बर यांचे नाही, तर स्मिता पाटील यांचे नाव लावतो. त्याच्या या निर्णयाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या होत्या. त्याने त्याच्या लग्नातही राज बब्बर यांना बोलावले नव्हते.

अभिनेत्री स्मिता पाटील त्यांच्या चित्रपटांमुळे जितक्या चर्चेत होत्या. तितक्याच त्या त्यांच्या खासगी आयु्ष्यामुळेदेखील चर्चेत राहिल्या. स्मिता पाटील यांनी बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते राज बब्बर यांच्याशी १९८३ ला लग्नगाठ बांधली. जेव्हा राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लग्न केले, त्याआधीच राज बब्बर व नादिरा यांचे लग्न झाले होते. राज बब्बर यांचे स्मिता पाटील यांच्याशी दुसरे लग्न झाले होते.

१९८६ ला स्मिता पाटील यांना मुलगा झाला. त्याच्या काही दिवसांनंतर लगेचच स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला. स्मिता पाटील यांच्या अचानक जाण्याने कलासृष्टीसह अनेकांना धक्का बसला होता. ३१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.