‘राजा राणीची गं जोडी’ ही लोकप्रिय झालेल्या मालिकांपैकी एक मालिका होती. ‘कलर्स मराठी’वर २०१९ला ही मालिका सुरू झाली होती. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय झालं. अभिनेता मनिराज पवार व अभिनेत्री शिवानी सोनार या दोघांची जोडी सुपरहिट झाली. मनिराजने साकारलेला रणजित आणि शिवानीने साकारलेली संजीवनी प्रेक्षकांच्या चांगलीस पसंतीस उतरली. ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेचा वेगळा चाहता वर्ग तयार झाला होता. आता या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्याची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचा पहिला प्रोमो काल, २० एप्रिलला समोर आला.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री झळकणार लोकप्रिय हिंदी मालिकेत, साकारणार प्रमुख भूमिका!

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत अमेय वर्दे या भूमिकेत झळकलेला अभिनेता संकेत खेडकरची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शनिदेवावर आधारित असलेली ही मालिका आहे. ‘जय जय शनिदेव’, असं मालिकेचं नाव असून या मालिकेत संकेत शनिदेवाच्या प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

संकेतची ही नवी मालिका ‘सोनी मराठी’वर प्रसारित होणार आहे. ८ मेपासून ‘जय जय शनिदेव’ मालिका सुरू होणार असून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता पाहायला मिळणार आहे. “सूर्यपुत्र, न्यायदाते आणि अवघ्या जगाचे कर्मदाते शनिदेवांची महागाथा…,” असं कॅप्शन लिहित ‘सोनी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Video: मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकर ट्रोल; अभिनेत्याची पत्नी भडकली, नावाच्या अर्थासह सांगितली जात, म्हणाली…

‘जय जय शनिदेव’ मालिकेचा हा जबरदस्त प्रोमो पाहून कलाकार मंडळींसह चाहत्यांनी संकेतवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अभिनेता आकाश नलावडे, अशोक फळदेसाई, मनिराज पवार अशा अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देते संकेतला शुभेच्छा दिल्या आहेत.