Reshma Shinde : छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून रेश्मा शिंदेला घराघरांत ओळखलं जातं. आजवर तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. रेश्माचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात गेल्यावर्षी २९ नोव्हेंबरला लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते.

रेश्माच्या नवऱ्याचं नाव पवन आहे. तो साऊथ इंडियन असून आयटी क्षेत्रात काम करतो. मात्र, तरीही पवन बायकोसह तितक्याच हौसेने मराठी सण साजरे करतो. रेश्मा आणि पवन यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा मोठ्या आनंदाने साजरा केला होता.

आता अभिनेत्री तिच्या सासरच्या कुटुंबीयांसह देवदर्शनाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचं सासर बंगळुरुला आहे. त्यामुळे रेश्मा तिच्या सासरच्या कुटुंबीयांसह उडुपी येथे देवदर्शनासाठी गेली होती. या ट्रिपचे सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उडुपी येथील ‘श्री कृष्ण मठ’ तसेच ‘गीता माता’ मंदिरात जाऊन रेश्मा व तिच्या सासरच्या कुटुंबीयांनी देवदर्शन केलं.

अभिनेत्री व तिच्या पतीने यावेळी साऊथ इंडियन लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. रेश्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या पतीसह तिची नणंद, नणंदेचा लहान मुलगा, सासरे यांचीही झलक पाहायला मिळत आहे. “चांगलं घर आणि कुटुंब या दोन्ही गोष्ट एकत्र मिळणं म्हणजे खूप मोठा आशीर्वाद आहे.” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.

रेश्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या गळ्यातील मंगळसूत्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हे मंगळसूत्र ‘पालमोनास’ (Palmonas) या रेश्माच्या स्वत:च्या ज्वेलरी ब्रँडचं आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रेश्मा शिंदेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत काम करत आहे. रेश्माने आजवर मालिकांमध्ये साकारलेल्या साध्या-सोज्वळ पण, तेवढ्याच खंबीर अशा भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यापूर्वी ती ‘रंग माझा वेगळा’, ‘चाहूल’ अशा मालिकांमध्ये झळकलेली आहे.