Sai Tamhakar Talks About Fear Of Losing People : सई ताम्हणकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने विविध माध्यमांमध्ये काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सई अनेकदा विविध विषयांवरील तिची मतं ठामपणे व्यक्त करीत असते. अशातच तिनं तिला आयुष्यात सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते याबद्दल सांगितलं आहे.
सईनं नुकतीच ‘अमुक तमुक’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिला तुला आयुष्यात सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “साप. मला सापांची भीती वाटते.” सई पुढे म्हणाली, “तशी मला फार भीती वाटत नाही; पण मला माझ्या माणसांना गमावण्याची भीती वाटते. वेळेबरोबर नातीसुद्धा वेगवेगळ्या टप्प्यांतून जात असतात. कधी ती टिकतात, कधी नाही. तर मला त्याची खूप भीती वाटते की, आता हे नातं असं आहे, तर मला माहीत नाही ते टिकणार आहे की नाही. पण, अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याची खूप भीती वाटते.”
मी खूप बदलले आहे – सई
सईला मुलाखतीत पुढे तिला राग आल्यावर ती काय करते, असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी खूप रडते, ढसाढसा रडते. मला राग आला की, कळत नाही काय करायचं. मी आधी खूप तापट होते. पण, मला असं वाटतं की, मी योग्य कारणांसाठी चिडते. मी उगाच चिडत नाही. पण, आता मी खूप बदलले आहे. मी आता खूप कमी रागावते. मी रागावले की, व्यक्त होते. मग माझ्या मनात काहीच राहत नाही.”
सईनं मुलाखतीत पुढे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बद्दलही सांगितलं आहे. त्याबद्दल तिनं सांगितलं की, कार्यक्रमादरम्यान त्यांना कधीच खोटं खोटं हसा, असं सांगितलं जात नाही, जे काही म्हणणं असेल, ते व्यक्त करा, असंच सांगितलं जातं.असं म्हटलं आहे.
दरम्यान, सईच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर अलीकडेच ती ‘गुलकंद’ चित्रपटातून झळकलेली. त्यामध्ये तिच्याबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’तील कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांतून झळकले. तिनं आजवर अनेक लोकप्रिय कलाकारांसह काम केलं आहे. सई मराठीसह हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांतही काम करते. त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.