माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा मलिकांनी केला होता. ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये समीर वानखेडे त्यांच्या नावे असलेल्या बारबद्दल बोलले आहेत.
अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”
शोमध्ये ट्रोल करणाऱ्या काही कमेंटवर समीर यांनी उत्तर दिलं. “अमली पदार्थ विरोधी कारवाया करता आणि तुमचा स्वतःचाच बियर बार होता, अशा बातम्या आल्या हे बरोबर नाही,” अशी कमेंट होती. त्यावर समीर यांनी स्पष्टीकरण दिलं. मला हे कधीपासून सांगायचं होतं, पण प्लॅटफॉर्म मिळत नव्हता, असं ते म्हणाले आणि एकच हशा पिकला.
शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”
समीर म्हणाले, “मी नोकरी फक्त माझी आई आणि भारतमातेसाठी करतो. पगारासाठी अजिबात करत नाही. मी फक्त राष्ट्रासाठी करतो. माझी आई चांगल्या घरची होती. नोकरी लागण्याआधी आईची जी संपत्ती होती, त्यात रेस्तराँदेखील होते. ते माझ्या नावावर आहे, पण त्याला काही लोकांनी बार म्हटलं. बार म्हणजे ते डान्सबार नाही. त्या रेस्तराँमध्ये लोक कुटुंबाबरोबर सकाळी नाश्ता करायला जातात. ते फॅमिली रेस्तराँ आहे, पण काही लोकांनी माझं नाव खराब करण्यासाठी ‘बार चालवतो, बार चालवतो’ असं म्हटलं. पण तुम्ही एकदा तिथे जाऊन बघा म्हणजे कळेल की ते नक्की काय आहे.”
पुढे ते म्हणाले, “तुमच्याकडे एखादी प्रॉपर्टी आहे, ती तुम्ही भाड्याने दिली आहे, ज्याचं तुम्ही भाडं घेता. त्याबद्दल मी सरकारला माहिती दिलेली आहे. त्यात चूक काय आहे? तुमच्या नावे आईची प्रॉपर्टी असणं गुन्हा आहे का? तुमच्या नावे ५-६ प्रॉपर्टी असेल तर तुम्ही खाकी वर्दी घालू शकत नाही, सरकारी नोकरी मिळवू शकत नाही असं कुठे लिहिलं आहे का? ही माझी चूक आहे का? की मला देशाची सेवा करायची आहे. माझ्या नावे प्रॉपर्टी आहे म्हणून मी देशसेवा करू नये, असं कुठे लिहिलं आहे का?”, असे सवाल वानखेडेंनी उपस्थित केले.
पुढे त्यांनी भ्रष्टाचाराबद्दल भाष्य केलं. “आपण कुठे अडकलो की पैसे देऊन सुटणं हीच आपली मानसिक परिस्थिती असते. आपल्याला लाच देण्याबद्दल वाईट वाटत नाही आणि घेणाऱ्याला वाटतं की तो त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. सरकारी अधिकारी झालाय तर तो पैसे खाणार. लोक पण पैसे देऊन काम करून घेतात. त्यामुळे काहीही घडलं की याने पैशासाठी केलंय, हेच लोकांच्या डोक्यात असतं. पण हेच मला बदलायचं आहे. सर्वांसाठी पैसे हेच काम करण्यामागची प्रेरणा नसते. मला पैशांसाठी काम करण्याची गरज नाही, जे लोक माझ्यावर टीका करतात, त्याचा मला फरक पडत नाही,” असं समीर वानखेडे म्हणाले.