Samir Choughule Shares Devendra Fadnavis Watch Maharashtrachi Hasyajatra Show : टीव्ही विश्वातील सध्याच्या काही लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांच्या यादीत नंबर वन असलेला शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. सोनी मराठी वाहिनीवर हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या शोमधील अनेक हास्यवीर आपल्या विनोदी स्किट्सने प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

दर्जेदार स्किट्स आणि ते सादर करणारे दर्दी कलाकार यामुळे शोचे केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर जगभरात असंख्य चाहते आहेत. सातासमुद्रापार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पोहोचली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळेच या शोला अनेक दिग्गजांनी नावाजलं आहे.

महानायक अमिताभ बच्चन आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर हेदेखील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोचे रसिक आहेत. रोज हा शो बघत असल्याचे त्यांनी याआधी कबुल केलं आहे.

अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा हा शो बघत असल्याचं शोमधील समीर चौघुलेंनी सांगितलं. सोनी मराठीच्याच एका कार्यक्रमात त्यांनी याबद्दलचा एक किस्सा सांगितला.

MHJ Unplugged या शोमध्ये समीर चौघुलेंनी सांगितलं की, “फडणवीस साहेबांनी विमानात मला त्यांच्या मोबाईलच्या टाइमलाईनवर महाराष्ट्राची हास्यजत्रा असल्याचं दाखवलं होतं. त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते म्हणाले, चौघुले जरा या इथे, हे बघा… तेव्हा मला वाटलं आता काय दाखवत आहेत? तर त्यांनी मला मोबाईलमध्ये दाखवलं आणि म्हणाले हे बघा टाईलाईन दिसतेय तुम्हाला… सगळं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आहे. आम्ही फक्त तुमचेच एपिसोड बघत असतो.”

दरम्यान, समीर चौघुले सध्या या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करीत आहेत. नुकताच त्यांचा ‘गुलकंद’ हा सिनेमा येऊन गेला. या सिनेमात त्यांच्यासह सई ताम्हणकर ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. शिवाय प्रसाद ओक आणि ईशा डे हेही मुख्य भूमिकांत होते. ‘गुलकंद’ हा सिनेमा प्रेक्षकांच्याही विशेष पसंतीस पडला होता.