महाराष्ट्र दिनानिमित्त काल अनेक मराठमोळ्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. काहींनी स्वत: गायलेल्या गोण्यांचे रील व्हिडीओ बनवले तर काहींनी पोस्ट केल्या आणि काहींनी जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. परंतु, यावेळी एका अभिनेत्याने केलेल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त त्याने पोस्ट करत भाष्य केलं आहे. हा अभिनेता म्हणजे संकेत कोर्लेकर.
संकेतने आजवर अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो सोशल मीडियावर सक्रिय असून विविध विषयांवर आधारित रील व्हिडीओ बनवताना दिसतो; तर त्याच्या या रील्स व्हिडीओजना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो, त्यामुळे संकेतचा आता एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
संकेत सोशल मीडियावर अनेक रील व्हिडीओ शेअर करत असतो. तसंच कामानिमित्तची माहितीही शेअर करत असतो. त्याचबरोबर स्वत:चे काही खास फोटोही शेअर करत असतो. अशातच काल महाराष्ट्र दिनानिमित्ताने त्याने एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा महागडा मोबाइल हरवला होता. याबद्दल त्याने सोशल मीडियावर व्हिडीओही शेअर केला होता. याचबद्दल त्याने आता पोस्ट शेअर केली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये संकेतने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात सर्वांना रोजगार मिळो, तो मिळाल्याने भिवंडी, कुर्ला, मानखुर्द अशा अनेक हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी तयार झालेले बहुतांश अमराठी चोर, लुटारू, कामधंद्याला लागून सामान्य नागरिकांची लुटमार कमी करो. ह्यातून सरकारला सीसीटीव्हीचे महत्त्व कळो, जागोजागी सीसीटीव्ही लागो, त्यामधून पोलिसांना नंबर प्लेटशिवाय फिरणाऱ्या चोरांचा चेहरा दिसो आणि कष्टाच्या कमाईने घेतलेल्या लोकांच्या गोष्टी परत मिळो हीच प्रार्थना.
दरम्यान, संकेतने आजवर ‘अजूनही बरसात आहे’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘विठू माऊली’, ‘अंतरपाठ’’ यांसारख्या मालिकांतून महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत; तर संकेत त्याची बहीण उमा कोर्लेकरबरोबर अनेक रील करताना दिसतो. या भाऊ-बहिणीच्या रीलला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो, त्यामुळे या दोघांचाही एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.