अभिनेता संकेत पाठक व अभिनेत्री सुपर्णा श्याम हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. सुपर्णा व संकेतने ‘दुहेरी’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. पडद्यावर प्रियकर प्रेयसीची भूमिका साकारताना ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनासुद्धा कळलं नाही, असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
संकेत व सुपर्णा यांनी २२ एप्रिल २०२३ रोजी लग्न केलं. जवळचे मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांच्या उपस्थितीत या जोडप्याने लग्नगाठ बांधली. दोघांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या लग्नातील मजेशीर किस्से सांगितले आहेत. दोघांनाही मंदिरामध्येच लग्न करायचं होतं हे त्यांचं आधीच ठरलेलं असल्याने इतर कुठल्याही ठिकाणी लग्न न करता मंदिरातच लग्न केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीमध्ये संकेत म्हणाला, “आम्ही जिथे लग्न केलं ते स्थळ खूपच सुंदर होतं. आम्हाला मंदिरातच लग्न करायचं आहे हे आम्ही घरी सांगितल्यानंतर सुपर्णाच्या बाबांनी शेगाव येथील मोठं मंदिर शोधलं आणि तिथे आमचं लग्न झालं.”
संकेत पुढे म्हणाला, “सुपर्णाच्या आई-बाबांची यासाठी आधी संमती नव्हती, पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याने ते म्हणाले, ठीक आहे आणि त्यासाठी त्यांनी भव्य मंदिर शोधलं, तिथे सगळी व्यवस्था केली आणि मंदिरात लग्न असल्याने आमचं खूप सात्विक पद्धतीने लग्न झालं. पण, यासाठी सुपर्णाच्या बाबांनी खूप मेहनत घेतली. अक्षरशः मंदिरातील परिसरात काही बदल करून घेतले, कारण तिथे जेवणाच्या किंवा एसीच्या काही सुविधा नसल्याने सगळं छान पार पडेल याची त्यांनी काळजी घेतली आणि साईबाबांच्या मंदिरात आमचं लग्न लागलं.” पुढे संकेत मंदिराबद्दल म्हणाला, “ते प्रचंड मोठं मंदिर होतं, खूप मोठा परिसर होता. हळदीला आम्ही खूपच मज्जा केली आणि हे करू शकत नाही किंवा याला परवानगी नाही वगैरे अशा काही गोष्टी घडल्या नाही आणि आम्हीसुद्धा मंदिर असल्याने सर्व मर्यादा पाळल्या.”
संकेत व सुपर्णा पुढे म्हणाले, “लग्न लागल्यानंतर घरी जाईपर्यंत आमच्या स्वागतासाठी जे जे काही ठरवलं होतं, जी मंडळी ते सगळं करणार होती, तीच तेव्हा निघून गेलेली. कारण आम्ही त्यांना ९ ची वेळ सांगितली होती, तरी ते १२ वाजेपर्यंत थांबलेले; पण आम्हालाच खूप उशीर झाला. आमचा गृहप्रवेशच रात्री अडीच वाजता झाला.” संकेत म्हणाला, “आम्ही जिथे राहतो, त्या परिसरात आमच्या स्वगतासाठी माझ्या भावंडांनी काही गोष्टी ठरवल्या होत्या, पण आम्हाला घरी पोहोचायला खूप उशीर झाला. तरी आम्ही पोहोचल्यानंतर जी माणसं त्यासाठी नेमलेली ती निघून गेल्यानंतर माझ्या भावंडांनी सगळं ठरवल्याप्रमाणेच केलं आणि आमचं खूप जंगी स्वागत करण्यात आलं. गृहप्रवेश करायला आम्हाला अडीच वाजले, पण खूप छान झालं आमचं लग्न.” सुपर्णा पुढे म्हणाली, “संकेतच्या भावंडांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळून घेतल्या आणि आम्हाला कशाचीही तेव्हा कमतरता जाणवली नाही. मला खूप आनंद आहे की मी या भावंडांच्या ग्रुपचा आता एक भाग आहे.”
दरम्यान, या मुलाखतीमध्ये दोघांनी त्यांची पहिली भेट कशी झाली याबद्दल सांगितलं आहे. संकेत म्हणाला, ‘दुहेरी’ मालिकेच्या सेटवर त्याने पहिल्यांदा सुपर्णाला पाहिलं होतं. मालिकेसाठीच्या एका फोटोशूटसाठी ती आली होती. पहिल्या भेटीबद्दल संकेत म्हणाला, “‘दुहेरी’ मालिकेच्या सेटवर तिला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिने लाल रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती आणि तेव्हाच आम्ही फोटोशूट केल्याने आमच्यात थोडं फार बोलणंही झालं. पण, तेव्हाच मला ती खूप आवडली होती. नंतर मालिकेनिमित्त १४-१५ तास एकत्र असल्याने आमच्यातील संवाद वाढले, भेटी गाठी वाढल्या आणि आम्ही कधी प्रेमात पडलो हे आमचं आम्हालाच कळलं नाही.”