मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सीमा घोगळे. मराठी मालिकांमधील विविध भूमिकांनी तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सीमाने ‘इंद्रायणी’, ‘आई कुठे काय करते’, ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’, ’खुलता खळी खुलेना’, ‘एक होती राजकन्या’ अशा अनेक मालिकांत काम केलं आहे. अभिनेत्रीने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या आहेत. सीमाने राजश्री मराठीशी साधलेल्या संवादात तिच्या वडिलांच्या निधनानंतरची दु:खद आठवण शेअर केली आहे.
याबद्दल सीमा म्हणाली, “माझ्या समोर माझे बाबा गेले. मी हॉस्पिटलला होते. पाच वाजून पाच मिनिटांनी माझे बाबा गेले. त्यानंतर नातेवाईक यायला दोन-अडीच तास लागले असते. मग रात्रभर ते ठेवलं, तर त्याचा नातेवाईकांना वगैरे त्रास होणार. त्यात घरी आई होती. मला ते नको होतं. त्यामुळे मी कोणालाच विचारलं नाही. चुलत भावंडं किंवा मावशी-काका यांपैकी कोणालाच विचारलं नाही. त्यांच्याबद्दलचा निर्णय मीच घेतला की, मला आता तीन तासांत त्यांचं जे काही आहे ते करायचं आहे.”
यानंतर ती म्हणाली, “नाट्यसमीक्षक अनंत घोगळे यांचं ८२ व्या वर्षी निधन झालं आहे अशी मी प्रेसनोट टाकली आणि तो मॅसेज मी सगळ्या ग्रुपमधून शेअर केला. त्यानंतर मावशी, काका आणि भाऊजींना सांगितलं की, तयारी करून ठेवा. इथे कोणी येऊ नका. तरी माझी मोठी बहीण आली. मग माझी मोठी बहीण आणि मी, आम्ही दोघी बाबांना घेऊन घरी गेलो. घरी तोपर्यंत सगळे आले होते आणि त्यांनी सगळं केलं होतं. मुलगा नाही तर आता पुढचे कार्य कोण करणार अशा चर्चा सुरू होत्या. बोलणारे बोलत असतात की, आमची मुलगी सगळं करेल वगैरे वगैरे.. पण तरी नाही म्हटलं तरी आमचं घोगळे कुटुंब थोडं जुन्या विचारांचं आहे.”
यापुढे सीमाने सांगितलं. “माझ्या घोगळे कुटुंबातील लोकांना काही गोष्टी पटतातच असं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की, काका बोलले होते ना? पण ते तर आता नाहीत? असं म्हणत त्यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला. पण माझं म्हणणं होतं की, माझं बाबांशी बोलणं झालं आहे की सगळं मी करणार, तर ते मीच करणार आणि मग मी बाबांचे सगळे कार्य केले. हे केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, माझं घोगळे कुटुंब माझ्यापासून दुरावलं. कारण न विचारता वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याचा घेतलेला माझा निर्णय त्यांना आवडला नाही. त्यांचं म्हणणं होतं, अंत्यसंस्कार केलेस; तर आता कार्य पण तूच कर. म्हटलं ठीक आहे.”
यानंतर सीमा म्हणाली, “बाबांचं दहावं-बारावं झाल्यानंतर, मधली कार्ये झाली आणि मग त्यांच्या वर्षकार्याच्या आदल्या दिवशी मला मासिकपाळी आली आणि याबद्दल मी आईला सांगितलं. म्हटलं उद्याचं कार्य मी कसं करु? कारण गावापासून सगळे लोक येणार आणि त्याला मी हात लावणं शक्य नाही. यावर मला आई म्हणाली की, गप्प बस. काही बोलू नकोस. जे होईल ते बघू. जे देवाच्या मनात असेल ते होईल आणि सकाळी साडेपाच वाजता फोन आला. गावातलं कोणीतरी वारल्यामुळे सूतक लागलं आहे. म्हणून वर्षकार्य एक आठवडा पुढे गेलं आहे. मला असं झालं की, त्यांचं कार्य माझ्या हातूनच होणार होतं.”
यापुढे सीमा म्हणाली, “माझी आई आधी खंबीर होती; पण बाबा गेल्यानंतर ती खचली. माझ्या बाबांची बरीच प्रॉपर्टी वगैरे होती असं नाही. फक्त एकच घर होतं. पण नातेवाईकांचं असं म्हणणं होतं की, प्रत्येकवेळी सीमाने आम्हाला येऊन विचारायला हवं होतं. ते न करता मी माझे माझे निर्णय घेतले, हे त्यांना आवडलं नाही. त्यामुळे ते माझ्यापासून दुरावले. ही गोष्ट माझ्यासाठी खूप वाईट होती.”
यापुढे सीमाने सांगितलं, “चुलत भावांशिवाय माझ्या तीन सख्ख्या बहीणीही दुरावल्या. बाबा गेल्यानंतर आम्ही घर कोणाच्या नावावर असणार आणि आईच्या जबाबदारीसाठी फक्त संपर्कात होतो. मग कोविडमध्ये आई गेली. त्यानंतर आम्ही तिघी बहिणी एकमेकींशी बोलत नाही. २०२० नंतर आता २०२५ पर्यंत… पाच वर्षे आम्ही एकमेकींशी बोलत नाही. कोण कुठे आहे? कोण कुठे राहतं? हेही आम्हाला माहीत नाही.”