Vidyadhar Joshi on his lifestyle: मालिका, नाटक व चित्रपट यांसाठी ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी ओळखले जातात. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, विद्याधर जोशी यांना एका मोठ्या आजाराचा सामना करावा लागला.
आजारपणातून बरे झाल्यानंतर विद्याधर जोशी ‘सुंदर मी होणार’ या नाटकातून रंगभूमीवर आणि ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर परतले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.
“…त्यामुळे नोकरी सोडली नाही”
विद्याधर जोशींनी नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या अभिनय, नोकरी, आजारपण याबद्दल वक्तव्य केले. ते म्हणाले, “नोकरी करत करत प्रायोगिक नाटकात काम करायचो. माझ्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत मी माझी संपू्र्ण नोकरी केली. माझ्या नशिबानं आणि थोडंसं माझ्या वागण्यामुळेसुद्धा मला कंपनीतल्या माझ्या सगळ्या ऑफिसर्स, सहकारी यांच्याकडून खूप पाठिंबा मिळाला. मी शिफ्टमध्ये काम करायचो. त्या शिफ्ट करून मी अभिनय क्षेत्रात काम करायचो. अभिनय क्षेत्रातील माझ्या मित्रांना माहीत होतं की, मी नोकरी करतो आणि त्यामुळे ते मला तितकीच छोटी भूमिका किंवा काम मला द्यायचे.”
त्यांनी पुढे सांगितले, “स्मिता तळवलकर यांच्या ‘ऊन-पाऊस’ आणि मोहन वाघ यांनी केलेलं नाटक ‘असू आणि असू’ यामध्ये मी कामं केली. ही माझी यशस्वी मालिका आणि नाटक होते. त्यावेळी माझा मुलगा नुकताच दहावी पास झाला होता. त्याचं पुढे संपूर्ण करिअर होतं. त्यामुळे यश मिळाल्यानंतरही मी नोकरी सोडली नाही.”
“रंगभूमीवर काम करायला सुरुवात केल्यानंतर माझ्यातली सकारात्मकता वाढली”
आजारपणानंतर खूप वर्षांनी रंगभूमीवर पाऊल टाकताना किती सकारात्मकता होती? यावर अभिनेते म्हणाले, “रंगभूमीवर काम करायला सुरुवात केल्यानंतर माझ्यातली सकारात्मकता वाढली. याचं कारण म्हणजे आजारपणानंतर आवडतं काम करायला मिळावं, असं वाटत होतं. तर नाटक करावं आणि ते मला झेपेल, असं वाटत होतं. कारण- मालिका ही खूप काळाची असते. मी एक मालिका काही काळापुरती केलीसुद्धा. पण, तेव्हा मी सांगितलं होतं की, मी जास्त काम करणार नाही. स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे यांनी मला कास्ट केलं होतं. ते मला म्हणाले की, कॅमिओ आहे. छोटीशी भूमिका आहे. सुरुवात कर. मी एका सिनेमात छोटीशी भूमिकादेखील साकारली; पण,नाटकाची ओढ जास्त होती.”
“नाटकाच्या रिहर्सल असतात. वाचन असतं. त्याबद्दल विचार करणं, पाठांतर असतं. त्यामुळे आजारपणाच्या काळात जे माझं सगळं आयुष्य औषधं, स्वत:ची प्रकृती, खाणं-पिणं याच्याभोवती बांधलं गेलं होतं. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मला या नाटकामुळे मिळालं. त्यामुळे नाटकात काम करायला सुरुवात केल्यानंतर माझ्यातली सकारात्मक ऊर्जा वाढली”, असे विद्याधर यांनी स्पष्ट केले.
पुढे ते असेही म्हणाले, “प्रत्येक प्रयोग हा माझ्यासाठी आव्हान असतो. माझा आजार हा फुप्फुसाशी निगडित आहे. तुमच्या फुप्फुसातील, छातीतील दम हेच ते वाक्य बोलण्याकरता आणि समोरच्यापर्यंत परिणामकरीत्या पोहोचवण्याकरिता लागतं. पण, मी ते क्रिएटिव्ह चॅलेंज अशा अर्थानं ते घेतलं आणि मी त्याच्याशी जुळवून घेतो. आता मी पूर्णपणे बरा आहे.”
“माझी जीवनशैली…”
खूप काम असल्यानं स्वत:कडे दुर्लक्ष झालंय, असं कधी झालंय का? यावर विद्याधर जोशी म्हणाले, “मी स्वत:कडे खूप लक्ष देतो, असं मी म्हणणार नाही. नोकरी आणि शूटिंग अशा दोन्ही गोष्टी मी करत असल्यानं मला खूप वेळ मिळायचा नाही. पण, जेव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा मी निश्चितपणे आमच्या आरसीएफ (RCF)च्या क्लबवर जाऊन जॉगिंग करायचो, जिममध्ये जायचो.”
“खाणं-पिणं वगैरे होतंच. पण, कुठलीच गोष्ट अतिरेकी प्रमाणात केली नाही. दारू पिणं मला आवडायचं. वेगवेगळे पदार्थ खायला आवडायचे. मी सिगारेटही ओढायचो; पण ते अतिरेकी प्रमाणात नाही. आता प्रमाण हे सगळ्यांसाठी वेगळं असतं. पण, मी साधारणपणे सगळं प्रमाणात करायचो. याव्यतिरिक्त स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष दिलं, असं नाही. पण, व्यायाम मात्र मी नियमितपणे करायचो.”
“माझी जीवनशैली उत्तम होती. सगळ्याची मजा घेत होतो. माझ्या या कामाव्यतिरिक्त मी अनेक म्युझिक कॉन्सर्टला जायचो. नाटक, सिनेमे बघायचो. फक्त काम करणं हे मला झेपणारं नाही.”
दरम्यान, याआधी दिलेल्या मुलाखतीत, डॉक्टरांनी मला लंग्ज फायब्रोसिस झाला आहे, असं सांगितलं. Interstitial lung disease (ILD) असं माझ्या आजाराचं संपूर्ण नाव होते, असे विद्याधर जोशी म्हणाले होते.