Rohini Hattangadi on Char Divas Sasuche: ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आजवर मराठी मालिका, चित्रपट, नाटक तसेच हिंदी सिनेमांतही अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्या ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.

अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या असल्या तरीही त्यांची प्रमुख भूमिका असलेली चार दिवस सासूचे ही मालिकेतील त्यांची भूमिकेबद्दल आजही बोलले जाते. या मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली होती. आता रोहिणी हट्टंगडी यांनी एका मुलाखतीत या मालिकेत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

‘चार दिवस सासू’चे’ ही मालिका १३ वर्षे चालली

रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच कांचन अधिकारी यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.या मुलाखतीत त्यांना विचारले की मालिका खूप वर्षे चालली, तर तुम्हाला वाटलं नाही का, की आपण यामध्ये अडकून पडलो आहे. एखादी चांगली भूमिका हातातून जात आहे. यावर ज्येष्ठ अभिनेत्री म्हणाल्या,”चार दिवस सासूचे ही मालिका १३ वर्षे चालली.”

“मला सांगावसं वाटतं की १३ वर्षात आमची इतर कुठली कामं अडली नाहीत. तेव्हा मानधन हे चेक स्वरुपात मिळायचे. मी ते रजिस्टरमध्ये नोंदवून ठेवायचे. तर एक दिवस मी गंमत म्हणून रजिस्टर उघडून बघितलं की किती-किती दिवसांनी चेक मिळाला आहे. किती दिवस काम केलं आहे, हे पाहिलं.

“तर मी महिन्यामध्ये दहा दिवस काम केलेलं आहे. एका महिन्यात मी सरासरी दहा दिवस काम केल्याचं त्या रजिस्टरमध्ये नोंदवून ठेवलं होतं. कधीकधी एका महिन्यात फक्त चारच दिवस काम केले आहे. सगळ्याच कलाकारांनी तितके दिवस काम केले. फक्त मीच तितक्या काम केलं असं नाही.”

“दुसरी गोष्ट अशी की आम्हाला आधीपासून कथानक माहित असायचं. सीन्स माहित असायचे. ते आता होत नाही.कारण- मला आठवतंय की समजा आता एक शेड्यूल झालं आहे. मग पुढचं शेड्यूल असायचं. त्या दोन शेड्यूलमध्ये सगळ्यांना सुट्टी असायची. म्हणजे १ ते २२ तारखेपर्यंत एक शेड्यूल मग मध्ये सुट्टी आणि त्यानंतर पुन्हा काम सुरू व्हायचं. पुढच्या शेड्यूलला आम्ही पहिल्या दिवशी पोहोचलो की मी असिस्टंटला गोष्ट विचारायचे. त्या महिन्यात कोणते एपिसोड होणार त्याची ती गोष्ट सांगायचा. मग तो सीन द्यायचा. त्यामुळे ते सगळं आमच्या डोक्यात असायचं.

“पुढच्या महिन्याच्या तारखा आधीच्या महिन्यात आम्हाला मिळायच्या. त्यामध्ये कधीही बदल झाला नाही. त्यावेळी सगळी कामं पूर्वनियोजित व्हायची. ती मालिका खूप नियोजित होती. कधी गरज लागली तर अॅडजस्टही केलं जायचं. मला कधीही त्या मालिकेत काम करताना असं वाटलंच नाही की आम्ही तेरा वर्षे त्या मालिकेत काम केलं आहे. संपताना वाटलं की की अरे आपण तेरा वर्षे या मालिकेत काम केलं.”

आता रोहिणी हट्टंगडी आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.