Actress Sulabha Arya : शाहरुख खानच्या जुन्या चित्रपटांचा बॉलीवूडमध्ये एक वेगळा चाहतावर्ग आहे. ‘देवदास’, ‘कुछ कुछ होता है’, ‘स्वदेस’, ‘वीर-झारा’ या सिनेमांची क्रेझ आजही किंग खानच्या चाहत्यांमध्ये कायम आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कल हो ना हो’ सिनेमाने सुद्धा सर्वांच्या मनावर एक वेगळी जादू निर्माण केली होती. ‘कल हो ना हो’चा भावनिक क्लायमॅक्स पाहून आजही अनेकांचे डोळे पाणावतात. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने सिनेप्रेमींच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.

‘कल हो ना हो’मध्ये शाहरुखने साकारलेला ‘अमन’, प्रीतीने साकारलेली ‘नैना’, सैफने साकारलेला ‘रोहित’ यासह जेनिफर, डॉ. प्रिया, लज्जो, कांताबेन ही सगळी पात्र आजही घराघरांत लोकप्रिय आहेत. विशेषत: कांताबेन आणि शाहरुख-सैफचा सिनेमात एक मजेशीर सीन आहे; ज्याचे रील्स व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात.

‘कल हो ना हो’मध्ये कांताबेन ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य यांनी साकारली आहे. सध्या त्या ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. सुबोध भावेच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सुलभा आर्य त्याच्या आजीची म्हणजेच नलिनी राजवाडे ही भूमिका साकारत आहेत.

या मालिकेत निकिताची भूमिका साकारणाऱ्या शर्मिला शिंदेने नुकतीच सुलभा आर्य यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली. यामध्ये शर्मिलाने सुद्धा त्यांच्या ‘कल हो ना हो’ सिनेमातील भूमिकेचा उल्लेख आवर्जून केला आहे. शर्मिला लिहिते, “जेव्हा पहिल्या दिवशी मी त्यांना ( सुलभा आर्य ) सेटवर भेटले तेव्हाच मला ‘कल हो ना हो’मधील कांताबेन आठवली होती आणि शाहरुख-सैफचा तो सीन आठवला…शर्मिला व सुलभा आर्य यांचा हा फोटो सुबोध भावेने काढला आहे.

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सुलभा आर्य यांच्यासह तेजश्री प्रधान, सुबोध भावे, किशोरी अंबिये, किशोर महाबोले, भारती पाटील, पूर्णिमा डे अशा दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर रोज संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाते.