टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. या मालिका प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनत असतात. काही मालिका आपल्या वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करतात. अशा मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘झी मराठी’वर प्रदर्शित होणारी ‘शिवा'(Shiva) ही मालिका आहे.
‘झी मराठी’ वाहिनीने या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये शिवाची काकू शिवाच्या सासूला म्हणजेच सीताईला चुकीची माहिती देत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर सीताई शिवाला जाब विचारणार असल्याचे म्हटले जात आहे.
सिताई विचारणार शिवाला जाब
प्रोमोच्या सुरुवातीला, शिवाच्या माहेरच्या घरात सगळे जण मंगळागौरीचा कार्यक्रम साजरा करत आहे, ज्यामध्ये ‘नाच ग घुमा’ या गाण्यावर पारंपरिक डान्सदेखील पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे, शिवा आणि सीताई एकमेकींसोबत फुगडी खेळताना दिसत आहेत. सगळे आनंदात दिसत आहेत. त्यानंतर शिवाची काकू मनातल्या मनात म्हणते, आता बघतेच हे घर त्यांच्या ताब्यात कसे राहते? त्यानंतर शिवाची काकू आणि सीताई एका खोलीत बसल्या असून त्या एकमेकींशी बोलत आहेत. शिवाची काकू तिच्या सासूला सीताईला सांगते, “कायद्याने हे घर शिवाच्या काकांचे आहे. जी शिवा आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढू शकते, ती तुम्हाला…?” त्यावर सीताई तिला म्हणते, “शिवा जर चुकत असेल तर तिला जाब विचारायलाच पाहिजे.” सीताई त्या खोलीतून निघून जाते. सीताई गेल्यावर शिवाची काकू मोठ्याने हसत आहे. त्यानंतर सगळे जण एकत्र झाल्याचे दिसत असून शिवाच्या चेहऱ्यावर टेन्शन पाहायला मिळते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “मंगळागौरीच्या शुभमुहूर्तावर येणाऱ्या संकटावर शिवा कशी करेल मात” असे म्हटले आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, शिवा ही मुलांसारखी राहणारी, घर सांभाळणारी, केसांचा बॉयकट असणारी मुलगी आहे. तिचे वडील गेल्यानंतर तिने गॅरेजमध्ये काम करून आपले घर सांभाळले आहे. तिच्या घरात तिची आजी, बहीण आणि आई हे सदस्य आहेत. तिच्या बहिणीचे आशुतोष नावाच्या मुलाबरोबर लग्न ठरते. मात्र, पैशांच्या लोभापायी ती त्या लग्नातून पळून जाते आणि तिच्या प्रियकराबरोबर लग्न करते. मात्र, त्याच मांडवात त्याच मुलाशी शिवाचे लग्न होते. शिवा इतर मुलींप्रमाणे नसल्याने तिच्या सासूला ती आवडत नाही. नवऱ्याचे तिच्यावर प्रेम नसल्याने त्याला तिच्याबरोबर राहायचे नसते. मात्र, सासऱ्यांचा आणि नवऱ्याच्या काका-काकूंचा तिला पाठिंबा असतो. तिच्या नवऱ्यावर आशुतोषवर शिवाचे प्रेम आहे.
आता शिवाला आशुतोषच्या आयुष्यातून बाजूला करण्यासाठी तिच्या सासूने सीताईने तिच्याकडून घटस्फोटाच्या पेपरवर सह्या घेतल्या आहेत. शिवानेदेखील त्यावर सही करून येत्या सहा महिन्यात मी तुमच्या सगळ्यांचे मन जिंकून घेईन, असे सीताईला सांगितले आहे.
आता शिवाचे घरच्यांचे मन जिंकण्याचे प्रयत्न सुरू असताना काकूमुळे तिच्या आयुष्यात कोणते नवीन संकट येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, मालिकेत पुढे काय होणार, याची उत्सुकतादेखील प्रेक्षकांना असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. मालिकेत पुढे कोणते नवीन वळण येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.