Shivali Parab and Vanita Kharat on Onkar Bhojane: अभिनेता ओंकार भोजनेची पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये एन्ट्री झाली आहे. त्याच्या परत येण्याने चाहत्यांसह अनेक कलाकारांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे. आता वनिता खरात आणि शिवाली परब यांनी ओंकार भोजनेबद्दल वक्तव्य केले आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यापैकी ओंकार भोजने हा एक आहे. अभिनेता गेली अडीच वर्षे या कार्यक्रमात दिसत नव्हता. दिवाळीच्या मुहुर्तावर त्याने पुन्हा एकदा या कार्यक्रमात एन्ट्री केली आहे.
“आम्हाला वाटलंच नाही की अडीच वर्षांचा काळ लोटला…”
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत वनिता खरात म्हणाली, “आमच्यात मैत्री आहेच. ती आयुष्यभर राहणार आहे. ती तुटणार नाही. आम्ही परवा शूटिंग केलं. तर आम्हाला वाटलंच नाही की अडीच वर्षांचा काळ लोटला आहे. जजदेखील म्हणाले की अडीच वर्षे गेले आहेत आणि ओंकार भोजने नव्हता असं वाटतच नाही. तो इतक्या वर्षांनी परत आला आहे, असं वाटत नाही.
“आम्हाला त्याची खूप आठवण येत होती. तो येणार हे जेव्हा आम्हाला कळले तेव्हा आमच्यामध्ये उत्साह होता. आम्ही खूप उत्सुक होतो. आता त्याला कोपरापासून दंडवत आहे की आता थांब, आता जाऊ नकोस.”
वनिता पुढे असेही म्हणाली की भोजने जाणार हे आम्हाला कळालं होतं तेव्हा आम्हाला वाईट वाटलं होतं. आता तो परत आल्यानंतर खूप आनंद झाला आहे. प्रेक्षकही खूप खूश आहेत.
“त्याचा प्रेक्षकवर्ग…”
ओंकारे भोजने परत आल्यानंतर पहिला दिवस कसा होता? यावर शिवाली म्हणाली, “तो दिवस भारी होता. भोजनेच्या पहिल्याच स्किटला संपूर्ण स्टुडिओ, लाईटवाले सगळेजण शूटिंगच्या सेटअपवर होता. त्याचा प्रेक्षकवर्ग बाहेरही आहे. पण, त्याच्या स्टुडिओमध्ये त्याचे मित्र जसे की आम्हीदेखील त्याचे प्रेक्षक आहोत.”
दरम्यान, महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या सेटवर सगळे सण खूप उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरे केले जातात. असेही अभिनेत्रींनी सांगितले.तसेच, कलाकार एकमेकांना प्रोत्साहन देत असतात, असेही वनिता खरात म्हणाली.