Shivani Rangole & Virajas Kulkarni Shared Memories : शिवानी रांगोळे व विराजस कुलकर्णी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. दोघेही एकमेकांना लग्नापूर्वी बरीच वर्ष ओळखत होते. अशातच आता त्यांनी त्यांच्या लग्नाआधीचे गमतीशीर किस्से सांगितले आहेत.

विराजस व शिवानी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, लग्नापूर्वी शिवानीची विराजसने तिला हटके अंदाजात प्रपोज करावं अशी इच्छा होती याबद्दल सांगितलं आहे. ‘अनुरुप विवाह संस्था’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं. यावेळी विराजस व शिवानीला त्यांचे काही फोटो दाखवण्यात आले आणि त्यामागचा किस्सा त्यांना सांगायला सांगितला होता. यावेळी शिवानी व विराजस यांनी त्यांच्या क्रुजवरील एका फोटोमागचा किस्सा सांगितला आहे.

लग्नाआधी शिवानीने विराजसकडे व्यक्त केलेली ‘ही’ इच्छा

मुलाखतीत विराजस म्हणाला, “लग्न ठरलं होतं, लग्नाची तारीख ठरली होती. दोन्ही घरच्यांनी होकार दिला होता, आम्ही सगळी तयारी करत होतो; पण शिवानीचा असा हट्ट होता की मी तिला सरप्राईज देत प्रपोज केलं पाहिजे, त्यामुळे मी ठीक आहे म्हणत तिला सरप्राईज देण्याचं ठरवलं.” विराजस याबद्दल पुढे म्हणाला, “तिला सरप्राईज हवं होतं म्हणून १४ फेब्रुवारी सांगत २ जानेवारीला प्रपोज करायचं ठरवलं. त्यावेळी कोविड वगैरे नुकतंच संपलं होतं. तेव्हा माझं ठरलं की क्रुजवर बसायचं, गोव्यात उतरायचं आणि गोव्यात एक जागा पाहिली होती, तिथे जायचं सनसेटच्यावेळी रिंग घालायची आणि परत यायचं.”

विराजस पुढे हा किस्सा सांगत म्हणाला, “क्रुजवर गेलो, गोव्यात पोहोचलो तेव्हा आम्हाला सांगितलं की चार डेकखाली एक कोविडची केस सापडल्यामुळे आमची क्रुज तिथेच थांबवली होती. तेव्हा अंगठी खिशातच राहिली आणि कोविडची टेस्ट केली. त्यानंतर असं कळलं की कोणालाच कोविड नाहीये, पण त्यांनी आम्हाला मुंबईला पाठवलं, तेव्हा कळलं की आता मला हिला क्रुजवरच प्रपोज करावं लागणार आहे. मी तिला तिथेच प्रपोज केलं आणि ठरलं की मुंबईत गेल्यावर सेलिब्रेट करू.”

५ दिवस क्रुजवर राहिले होते शिवानी-विराजस

विराजस याबद्दल पुढे म्हणाला, “मुंबईत सेलिब्रेट करू असं ठरलेलं असताना मुंबईतील अधिकाऱ्यांनी सांगितलं की गोव्यात केलेल्या कोविडच्या टेस्ट ते ग्राह्य धरत नाही, त्यामुळे पुन्हा टेस्ट कराव्या लागणार; त्यामुळे परत दोन दिवस आम्ही क्रुजवर थांबलो आणि आमची दोन दिवसांची क्रुज सहा दिवसांची झाली. तेव्हा क्रुजवर सगळ्यात आनंदी आम्हीच होतो. त्यात तिथे स्टाफही मराठी असल्याने छान त्यांच्याबरोबर आम्ही ५ दिवस क्रुजवर राहिलो; तेव्हा क्रुजवरच्या फोटोग्राफरने काढलेला आमचा हा फोटो आहे.”