लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन व ‘बिग बॉस १७’ चा विजेता मुनव्वर फारुकी कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतो. आता तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. मुनव्वरने दुसरं लग्न केल्याचं वृत्त समोर आलं आहे. ३२ वर्षीय मुनव्वर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे, अशी माहिती ‘टाइम्स नाऊ’ने दिली आहे.

मुनव्वरने १०-१२ दिवसांपूर्वी लग्न केलं असून त्याच्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक व मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. टाइम्स नाऊने त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या हवाल्याने मुनव्वरच्या लग्नाची माहिती दिली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मुनव्वरचा निकाह आयटीसी मराठा इथं पार पडला. लग्नाची बातमी लपवून ठेवायची असल्याने त्याने फोटो किंवा लग्नाशी संबंधित कोणतीच माहिती शेअर केलेली नाही. त्याने मेहजबीन कोटवाला नावाच्या मुलीशी लग्न केलं आहे, ती मेकअप आर्टिस्ट आहे. मुनव्वरचं लग्न १०-१२ दिवसांपूर्वीच झालं आहे.

“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

मुनव्वरची जवळची मैत्रीण व अभिनेत्री हिना खानने त्याच्या लग्नाला हजेरी लावली होती, असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या एक फोटो स्टोरीला लावला होता. त्या फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये ‘मेरे यार की शादी है’ हे गाणं तिने लावलं होतं. त्यादिवशीच मुनव्वरचं लग्न झालं, अशी चर्चा आहे.

हिना खानने शेअर केलेली स्टोरी

‘बिग बॉस १७’मध्येही मुनव्वरच्या वैयक्तिक आयुष्याची खूप चर्चा झाली होती. या शोमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खान वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आली होती, तिने मुनव्वरवर फसवणुकीचे आरोप केले होते. या शोमध्ये त्यांचं भांडणं खूप गाजलं होतं. मुनव्वरने यापूर्वीही अनेक तरुणींची फसवणूक केल्याचे आरोप या शोमध्ये त्याच्यावर झाले. त्यात नाझिला सिताशी हिचाही समावेश होता.

दरम्यान, मुनव्वर फारुकीबद्दल बोलायचं झाल्यास त्याच्या लग्नाची बातमी खरी असेल तर हे त्याचं दुसरं लग्न असेल. त्याने २०१७ मध्ये जास्मिनशी लग्न केलं होतं, या लग्नापासून त्याला एक मुलगाही आहे आणि तो मुनव्वरजवळ राहतो. मुनव्वर आणि जास्मिन काही कारणांमुळे २०२२ मध्ये वेगळे झाले. त्याच्या पहिल्या पत्नीनेही दुसरं लग्न केलं आहे. घटस्फोटानंतर मुनव्वरने सोशल मीडियावर एन्फ्लुएन्सर नाझिला सिताशीला डेट करायला सुरुवात केली. पण त्यांचंही ब्रेकअप झालं, नंतर त्याच्या आयुष्यात आयशा खान आली पण ते दोघेही वेगळे झाले. आता मुनव्वरने मेहजबीनशी लग्न केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप मुनव्वर फारुकी किंवा त्याच्या टीमने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.