Star Pravah Aboli Serial Off Air : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या २७ ऑक्टोबरपासून ‘काजळमाया’ ही नवीन मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेमुळे वाहिनीवर मोठा बदल करण्यात येणार आहे. ‘काजळमाया’चं प्रसारण रात्री १०:३० वाजता केलं जाईल. त्यामुळे अर्णव-ईश्वरीची ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेची वेळ बदलून रात्री ८ वाजताची करण्यात आली आहे.
तर, कावेरी-यश यांची ‘कोण होतीस तू काय झालीस तू!’ ही मालिका रात्री उशिराच्या स्लॉटला अकरा वाजता प्रक्षेपित केली जाईल. सध्या ११ वाजता ‘अबोली’ मालिका ऑन एअर होते. मात्र, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल. या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं असून कलाकारांनी नुकतीच Wrap Up पार्टी केली आहे.
‘अबोली’ मालिका २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिरियलने जवळपास ४ वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. विशेष म्हणजे, रात्री उशिराच्या स्लॉटला सुद्धा अबोली मालिकेला खूप चांगला टीआरपी मिळत होता. यामध्ये गौरी कुलकर्णी आणि सचित पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं असून नुकतीच अबोलीच्या संपूर्ण टीमने Wrap Up पार्टी केली. यादरम्यानचे फोटो सेलिब्रिटी स्टायलिस्ट तन्मय जंगमने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सगळ्या टीमच्या उपस्थित यावेळी मालिकेच्या अंतिम भागाचं प्रसारण करण्यात आल्याचं तन्मय शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अबोली मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा या मालिकेला प्रचंड मिस करणार आहेत. गौरी आणि सचित यांच्यासह रेशम टिपणीस, रसिका धामणकर, माधव देवचक्के, कोमल कुंभार, मयुरी वाघ असे दमदार कलाकार या मालिकेचा भाग होते.