Star Pravah Tu Hi Re Maza Mitwa Time Slot Changes : ‘स्टार प्रवाह’वर २७ ऑक्टोबरपासून महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे. हा बदल नेमका काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर या महिन्यात ‘काजळमाया’ ही हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर, अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. ही मालिका रात्री १०:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे सध्या साडेदहाला सुरू असणाऱ्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेचं काय होणार याबद्दल सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता.
अखेर ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेला प्राइम स्लॉट देण्यात आला आहे. ही मालिका २७ ऑक्टोबरपासून रात्री ८ वाजता प्रसारित केली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांत ‘तू ही रे माझा मितवा’ला रात्री उशिराच्या स्लॉटला सुद्धा जबरदस्त टीआरपी मिळताना दिसतोय. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या वाहिनीवर ८ वाजता गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ ही मालिका प्रसारित केली जाते. आता २७ ऑक्टोबरपासून ही मालिका रात्री ११ वाजता प्रसारित केली जाईल. अचानक प्राइम स्लॉट बदलल्यामुळे या मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत.
स्टार प्रवाहवरील मालिकांची नवीन वेळ
- तू ही रे माझा मितवा – रात्री ८ वाजता
- कोण होतीस तू, काय झालीस तू! – रात्री ११ वाजता
- काजळमाया ( नवीन मालिका ) – रात्री १०:३० वाजता
‘स्टार प्रवाह’ने मालिकांच्या वेळेत बदल होणार असल्याची घोषणा केल्यावर सगळेच प्रेक्षक चक्रावले होते. याबद्दलच्या कमेंट्स सुद्धा प्रोमोवर आल्या आहेत. “तू ही रे माझा मितवा’ला पहिल्यांदा बरोबर स्लॉट मिळाला…अनपेक्षित बदल”, “तुम्हाला वेळ बदलायची होती तर दुसऱ्या कोणत्यातरी मालिकेची बदलायची…KHTKZT ला चांगला टीआरपी होता”, “काहीच गरज नव्हती”, “टीआरपी कमी आहे त्या मालिकेची वेळ बदलायची ‘कोण होतीस….’ मालिका चांगली सुरू होती” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

मात्र, ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेच्या चाहत्यांनी या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला आहे. यामध्ये प्रेक्षकांना अर्णव-ईश्वरीची हटके स्टोरी पाहायला मिळायला मिळत आहे. या भूमिका अनुक्रमे अभिजीत आमकर आणि शर्वरी जोग यांनी साकारल्या आहेत.