Star Pravah Dhinchyak Diwali 2025 : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ढिंचॅक दिवाळी’ साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रवाहचे सगळे कलाकार एकत्र येऊन सेलिब्रेशन करतील. मात्र, यंदाच्या दिवाळी कार्यक्रमात दोन खास पाहुणे सहभागी होणार आहेत. ‘स्टार प्रवाह’बरोबर पहिल्यांदाच दिवाळीचा सोहळा गाजवण्यासाठी सज्ज झालेली ही नवीन जोडी कोण आहे पाहुयात…
विनोदाचं अचूक टायमिंग साधत महाराष्ट्राला खळखळून हसवण्यासाठी सज्ज होणार आहेत महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर अर्थातच निलेश साबळे आणि भाऊ कदम. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांना छोट्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र उत्सुक होता. अखेर ही प्रतीक्षा संपणार असून स्टार प्रवाहच्या ‘ढिंचॅक दिवाळी’ कार्यक्रमात ही जोडी एकत्र झळकणार आहे.
याविषयी सांगताना डॉ. निलेश साबळे म्हणतो, “खूप दिवसांपासून प्रेक्षक याची वाट पाहत होते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मी आणि भाऊ कदम
‘स्टार प्रवाह’च्या ‘ढिंचॅक दिवाळी’ कार्यक्रमात काहीतरी भन्नाट घेऊन येतोय. भाऊबरोबर काम करताना नेहमीच मजा येते. भाऊला मी कळलोय आणि मला भाऊ कळलाय असं म्हटलं तरी चालेल. गेली १५ वर्षे आम्ही एकत्र काम करतोय. भूमिकेचं सोनं करणारा नट लेखकाला हवा असतो. भाऊ कदमचं पण काहीसं असंच आहे. प्रत्येक भूमिकेचं तो सोनं करतो. या कार्यक्रमातही प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजन असेल”
भाऊ कदम म्हणाले, “यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने ढिंचॅक असणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीबरोबर मी पहिल्यांदा काम करतोय त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. निलेश साबळेबरोबर तर इतक्या वर्षांची मैत्री आहे. हीच मैत्री निराळ्या ढंगात प्रेक्षकांसमोर येईल. दिवाळीला हास्याचा फराळ प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत”
दरम्यान, ‘ढिंचॅक दिवाळी’ हा विशेष कार्यक्रम १२ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.