Gharoghari Matichya Chuli upcoming twist: ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने नुकतेच ५०० एपिसोड पूर्ण केले आहेत. या निमित्ताने कलाकारांनी आनंद साजरा केल्याचेदेखील पाहायला मिळाले. मालिकेत येणारे सततचे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकी, हृषिकेश, सौमित्र, सौमित्रची पत्नी आणि सांरग सतत ऐश्वर्याचे कट कारस्थान सिद्धू करून तिला शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, ऐश्वर्या सतत चलाखी करत सर्वांना चकवा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोर्टातसुद्धा ऐश्वर्याने रणदिवे कुटुंब तिला कशाप्रकारे त्रास देते, याचे पुरावे सादर केले होते. तसेच, ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबाला तुरुंगात पाठवणार असल्याचे धमकी दिली होती तर जानकीने ऐश्वर्याला तिचा खोटारडेपणा सिद्ध करेन असे म्हणाल्याचे दिसले होते.

आता स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबाविरुद्ध पुन्हा एकदा मोठा कट रचला आहे. तिने गुंडांच्या मदतीने सौमित्रीला बेशुद्ध करून एका ठिकाणी बसवले आहे. तसेच, त्याच्या चेहऱ्यावर काळा मास्क लावला आहे.

ऐश्वर्या म्हणते, “जानकी व हृषिकेश इथे मास्कमॅनला मारायला येतील. पण, हृषिकेशच्या हातून त्याचा सावत्र भाऊ सौमित्र मारला जाईल”, प्रोमोमध्ये पाहायला मिळते की हृषिकेश व जानकी जिथे सौमित्र बेशुद्ध अवस्थेत आहेत. तिथे पोहोचतात. हृषिकेशच्या हातात बंदूक आहे. सौमित्रीच्या चेहऱ्यावर मास्क असल्याने जानकी व हृषिकेश त्याला ओळखू शकत नाही. हृषिकेश त्याच्यावर गोळी झाडणार तितक्यात जानकीच्या काहीतरी लक्षात येते. ती त्याचा हात दुसरीकडे वळवते. ती त्याला सांगते की हा मास्कमॅन नाही तर सौमित्र भाऊजी आहेत. त्यांचे शूज बघा.”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की एक मास्क घातलेला माणूस तिथेच असतो. तो पळून जाताना हृषिकेश त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तो मास्कमॅन पळून जाऊ लागतो. तितक्यात जानकी त्याच्यावर गोळी झाडते. त्यानंतर मात्र तिच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव दिसत आहेत. हा प्रोमो शेअऱ करताना स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर, “खऱ्या मास्कमॅनला गोळी मारल्यानंतर आणखी कोणतं नवं संकट ओढवणार रणदिवे कुटुंबावर…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “यांना बहुतेक घर संसार नाही वाटतं. उठसूठ फक्त कटकारस्थानच करत असतात”, “नानाला म्हातारपणात असल्या नको त्या उचापती कोण करायला सांगतयं ?”, “नानांना केलं ठार”, “या मालिकेचा प्रोमो पाहून मालिका बघण्याची कधीच हिंमत झाली नाही. कशी काय यांना इतकी फालतूगिरी सुचते”, “घरोघरी मातीच्या चुली मालिका म्हणजे एकदम स्लो मोशनमध्ये भाजलेला कांदा, पात्रं एवढं अभिनय करतात की, चुलीपेक्षा त्यांच्याच चेहऱ्यावरून धूर निघतो आणि कथा अशी की “मातीची चूल पेटते, पण लॉजिक नेहमी विझतं.”

“किती ही फालतुगिरी”, “आता स्क्रिप्ट लिहिण्याचीसुद्धा हद्द झाली. एवढं विकृत कसं काय सुचू शकत?”, “आता हा मास्कमॅन म्हणजे नक्की नानाच असतील आणि आता जानकीने दुसरा खून केला म्हणून ऐश्वर्या बोंब मारणार. एकूण काय मालिकेचं शीर्षक सांसारिक आहे आणि गोष्ट कारस्थानाची आहे. सगळी फालतुगिरी”, “ही एक वेगळीच फालतुगिरी आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, आता मालिकेत काय घडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.