Star Pravah Halad Rusali Kunku Hasala New Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ या नव्या मालिकेची घोषणा केली. तसेच याचा जबरदस्त प्रोमो देखील प्रदर्शित केला. ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर व अभिनेता अभिषेक रहाळकर हे दोन कलाकार या मालिकेतून पुनरागमन करणार आहेत.
खेडेगावातील मुलगी ( समृद्धी केळकर ) आणि शहरातील मुलगा ( अभिषेक रहाळकर )… या दोघांची हटके गोष्ट प्रेक्षकांना ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. समृद्धीने यापूर्वी ‘फुलाला सुगंध मातीचा’ या लोकप्रिय मालिकेत काम केलेलं आहे. समृद्धीच्या मालिकेने २०२२ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र, मालिका संपून जवळपास दोन-अडीच वर्षे उलटली असली तरी आजही समृद्धीची लोकप्रियता घराघरांत कायम आहे.
आता समृद्धी पुन्हा एकदा अभिषेकच्या बरोबरीने मालिकाविश्वात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिषेकने यापूर्वी ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. आता या दोघांची जोडी आता आपल्याला ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ या मालिकेत पाहायला मिळेल.
‘हळद रुसली, कुंकू हसलं’ ही मालिका केव्हा सुरू होणार, या मालिकेचा पहिला भाग केव्हा ऑन एअर होईल याबद्दल चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर वाहिनीने या मालिकेचा मुहूर्त जाहीर केला आहे. ७ जुलैपासून दुपारी १ वाजता ही मालिका ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केली जाईल.
सध्या वाहिनीवर दुपारी १ च्या स्लॉटला ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सुरू आहे. त्यामुळे समृद्धीच्या नव्या मालिकेसाठी ‘प्रेमाची’ गोष्ट मालिका सर्वांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेची वेळ पुन्हा बदलणार की, ही मालिका सर्वांचा निरोप घेणार हे लवकरच स्पष्ट होईल. या नव्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सगळेजण अभिषेक व समृद्धीच्या पुनरागमनासाठी उत्सुक आहेत.