Star Pravah New Serial Kajalmaya : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने ‘काजळमाया’ या त्यांच्या हॉरर मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीख नुकतीच जाहीर केली आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे. ‘काजळमाया’मध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांच्यासह आणखी एक अभिनेत्री झळकणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसणारी ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण आहे? जाणून घेऊयात…

‘काजळमाया’ मालिकेत विलक्षण सुंदर अशा चेटकीण पर्णिकाची भूमिका अभिनेत्री रुची जाईल साकारणार आहे. पर्णिकाला चिरतारुण्याचं वरदान आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. स्वतःचं अस्तित्व आणि सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा या पलीकडे कुठलाही विचार तिच्या मनात कधीच नसतो. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. आता आरुष ( अक्षय केळकर ) या पर्णिकाचा सामना कसा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘काजळमाया’च्या निमित्ताने रुची जाईल पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर एन्ट्री घेणार आहे. मालिकाविश्वात दमदार एन्ट्री करण्यास ती सज्ज झाली आहे. या भूमिकेविषयी सांगताना रुची म्हणते, “माझी पहिलीवहिली मालिका आहे त्यामुळे मी अतिशय उत्सुक आहे. मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनेत्री व्हायचं हे मी पाहिलेलं स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. ‘काजळमाया’ मालिकेत मी विलक्षण सुंदर अशा पर्णिका चेटकीणीच्या रुपात दिसणार आहे. खूप आव्हानात्मक भूमिका आहे. प्रोमो शूटच्या दिवशी जेव्हा मी स्वत:ला चेटकीणीच्या रुपात पाहिलं तेव्हा मी देखील एका क्षणासाठी घाबरले होते.”

“मालिकेचं कथानक जितकं गूढ आहे तितकच उत्कंठावर्धक आहे. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी पुढे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता वाढेल. नव्या रुपात आणि नव्या माध्यमात मी माझं पहिलं पाऊल टाकलं आहे. प्रेक्षकांचं प्रेम मिळावं इतकीच अपेक्षा आहे” अशी भावना रुची जाईलने व्यक्त केली.

दरम्यान, ‘काजळमाया’ ही नवीन मालिका २७ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका रात्री ११ वाजता प्रसारित केली जाईल.