Kon Hotis Tu Kay Zalis Tu Serial Update : स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करीत आहे. या मालिकेतून स्टार प्रवाहचीच लोकप्रिय जोडी गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव यांनी पुन्हा कमबॅक केलं आहे. ’ या मालिकेमध्ये दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
नुकतंच मालिकेत यश आणि कावेरी यांच्या लग्नाचा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यश आणि अमृताचं लग्न ठरलेलं असूनही ऐन लग्नात कावेरीनं यशबरोबर लग्नगाठ बांधली आणि यामुळे धर्माधिकारी कुटुंबाला चांगलाच धक्का बसला. कावेरीनं आपली फसवणूक करून लग्न केल्याचं यश सर्वांना भासवत आहे, पण यात त्याची कावेरीला खंबीर साथ आहे.
यश-कावेरी यांच्या लग्नामुळे आता अमृताचा प्लॅन फसला आहे. यशशी लग्न करून धर्माधिकारी कुटुंबीयांना उद्ध्वस्त करण्याचा तिनं प्लॅन आखला होता. मात्र, यश-कावेरीचं लग्न झाल्यामुळे तिचा प्लॅन फसला आहे. पण, आता अमृता तिची शक्कल लावून पुन्हा धर्माधिकारी कुटुंबात येणार आहे. अमृता उदयशी लग्न करणार आहे.
उदय आणि अमृताचे लग्न झाल्याचा नवा ट्विस्ट ‘कोण होतीस तू काय झालीस तू’मध्ये येणार आहे. उदय आणि अमृता यांच्या लग्नाला माँनेसुद्धा पाठिंबा दिला आहे. याचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये कावेरी माँला ‘अमृता या घरात कोणत्या नात्यानं राहतेय’ असा प्रश्न विचारते. यानंतर उदय आणि अमृता लग्न करून घरात येतात. या दोघांच्या स्वागतासाठी माँ कावेरीला बोलावतात.
‘कोण होतीस तू काय झालीस तू’ प्रोमो
यानंतर माँ कावेरीला असं म्हणतात, “तू अमृताचं नातं विचारत होतीस ना? तर ती आता तुझी मोठी जाऊ आहे आणि या नात्याने तू तिच्या पाया पड.” यानंतर कावेरी अमृताच्या पाया पडते आणि तिच्या पायाला चिमटा काढते, तेव्हा अमृता ‘आई…’ अशी ओरडते. पुढे कावेरी तिला ‘आई… नाही आता जाऊबाई…’ असं म्हणते.
या प्रोमोवरून आता दोघींची आता एकमेकींबरोबर चांगलीच लढत होणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान, मालिकेतला हा नवा ट्विस्ट अनेकांना आवडला आहे. तशा प्रतिक्रियासुद्धा प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. येत्या १७ ऑक्टोबर रोजी मालिकेतला हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.