Star Pravah Mi Savitribai Jotirao Phule New Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. मधुराणी या मालिकेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारणार असून डॉ. अमोल कोल्हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत दिसतील. अमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.

याबाबत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “कलाकार म्हणून माझं भाग्य आहे की वेगवेगळ्या लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं हे एक वेगळं आव्हान आहे. विचारांची धगधगती मशाल म्हणजे महात्मा जोतीराव फुले. व्यवस्थेला प्रश्न विचारायची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. अशा क्रांतीकाराचे विचार पोहोचवणं ही मोठी जबाबदारी आहे.”

“स्टार प्रवाहबरोबरचं नातं खूप खास आहे. माझ्या आयुष्याला ज्या भूमिकेने कलाटणी दिली ती ‘राजा शिवछत्रपती मालिका मी स्टार प्रवाहबरोबर केली. जवळपास १७ वर्षांनंतर आता स्टार प्रवाहबरोबर फक्त अभिनेता म्हणून नाही तर मी निर्माता म्हणून देखील काम करणार आहे. मी या मालिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं समाजाप्रती जे योगदान आहे ते शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य आहे. आज उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या प्रेरणा जर कुणी असतील तर त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. त्यामुळे सावित्रीबाईंचा इतिहास मालिकेतून साकारणं माझ्यासाठी अत्यंत भावनिक गोष्ट आहे.”

या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “रसिकांच्या मनोरंजनासह सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य स्टार प्रवाह वाहिनी सातत्याने करत आली आहे. आजच्या जगात सर्वत्र स्त्री-पुरुष समानतेची वाटचाल सुरू आहे. देशातील महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया सक्षमपणे काम करताना दिसतात. परंतु, काही काळापूर्वी त्यांची मर्यादा केवळ घर आणि मुलांपर्यंतच होती. ज्या समाजात मुलगी आठ वर्षांची झाली की तिला “वयात आली” असे म्हणत तिचे हसणे–खेळणे रोखले जाई, जिथे शिक्षण ही फक्त काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती अशा समाजात धैर्याने घराबाहेर पडून शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवून देणाऱ्या महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोठी क्रांती घडवली. केवळ शिक्षणच नव्हे तर विधवा पुनर्विवाह, बालविवाह, सतीप्रथा अशा अनेक अमानुष रूढींना ठामपणे विरोध करून संतुलित समाज उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हा ऐतिहासिक प्रवास शक्य झाला तो सावित्रीबाई फुले यांच्या कष्टामुळे आणि महात्मा जोतीबा फुले यांच्या ठाम पाठिंब्यामुळे. सावित्रीबाई संसार सांभाळून समाजपरिवर्तनाची लढाई लढल्या. त्यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री समाजात मानाने जगू शकते. अशा महान क्रांतिज्योतीची कथा मांडणं क्रमप्राप्त होतं. माझी खात्री आहे की ही मालिका समस्त मालिका विश्वात मैलाचा दगड ठरेल.”

दरम्यान, ही नवीन मालिका नव्या वर्षात ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.