Lapandav Fame Rupali Bhosle Talks About Svayamvar : रुपाली भोसले मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘लपंडाव’ या मालिकेतून झळकत आहे. त्यात ती सरकार हे महत्त्वपूर्ण पात्र साकारत आहे. सध्या या मालिकेत सरकारची मुलगी सखीचं स्वयंवर सुरू आहे. अशातच रूपालीने नुकतीच याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
रुपाली भोसले मालिकेत साकारत असलेल्या सरकार या पात्राला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. तिच्याबरोबर यामध्ये कृतिका देव व चेतन वडनेरे मुख्य भूमिका साकारत आहेत. सध्या मालिकेत कृतिकाचं म्हणजेच सखीचं स्वयंवर सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अशातच रूपालीने ‘अल्ट्रा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.
स्वयंवराबद्दल रुपाली भोसलेची प्रितिक्रिया
रूपालीला मुलाखतीत तू खूप छान दिसतेयस; इतकी की तुझंच स्वयंवर करायला हवं, तू तयार आहेस का स्वयंवरासठी, असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “नाही मला स्वयंवर वगैरे करायचं नाहीये. माझ्याकडे तेवढा संयमच नाहीये आणि का आपण परीक्षा घ्यायची कोणाची. उद्या जर मुलांनी असं म्हटलं की, मला मुलीची परीक्षा घ्यायची आहे, तर आपल्याला किती त्रास होईल. आपला अहंकार दुखावला जाईल. मला नाही वाटत की, अशा काही परीक्षा घ्यायला हव्यात.”
रुपाली पुढे याबद्दल म्हणाली, “जितकी आपल्याला भीती असते, तितकीच मुलांनाही भीती असते की कोण अनोळखी व्यक्ती आपल्या घरात येणार आहे. ती आपल्या आई-वडिलांबरोबर राहणार आहे. ती सगळ्या गोष्टी नीट करू शकणार आहे का? आधी जसं घर जोडलेलं होतं, तसं जोडून ठेवायला तिला जमेल का या गोष्टींची काळजी त्यांनाही असते. त्यामुळे का त्यांची परीक्षा घ्यायची.”
दरम्यान, रुपाली भोसलने आजवर मराठीसह हिंदी मालिकेतही काम केलं आहे. ‘लपंडाव’ मालिकेपूर्वी ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून संजनाच्या भूमिकेतून झळकलेली. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला. अशातच आता तिच्या सरकार या नवीन भूमिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.