Muramba Serial New Promo : ‘मुरांबा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने ७ वर्षांचा मोठा लीप घेतला होता. तेव्हापासून रमा व अक्षय एकत्र जरी रहात असले तरी त्यांच्यात दुरावा असल्याचं पाहायला मिळतं. रमाच्या मनात अक्षयसाठी अजूनही प्रेम असलं तरी अक्षय मात्र मालविकाबरोबर साखरपुडा करायला तयार झाल्याचं पाहायला मिळतं.
‘मुरांबा’ मालिकेत नेहमीच काही न काही ट्विस्ट येत असतात. या मालिकेत सध्या इरावती अक्षय व मालविका यांचं लग्न व्हावं यासाठी प्रयत्न करत असते, कारण तिला रमा व अक्षय यांना दूर करायचं असतं. अक्षयसुद्धा रमाला त्याच्या मनात अजून रमाच असून त्याचं तिच्यावर प्रेम आहे हे दाखवत नसल्याने इरावती या संधींचा फायदा घेऊन काही न काही कट कारस्थान करून या दोघांमध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न करत असते.
रमा अक्षयने एकत्र यावं अशी त्यांच्या लेकीची आरोहीची खूप इच्छा असते. अशातच आता तिची ही इच्छा पूर्ण होणार असल्याचं मालिकेच्या नवीन प्रोमोमधून पाहायला मिळतं. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला असून त्याला “अक्षयच्या मनातील भावना अखेर ओठांवर येणार” अशी कॅप्शन दिली आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये रमा अक्षयला “तुम्ही साखरपुडा करत आहात हे सांगितलं नाही” असं म्हणते. त्यावर अक्षय “आधी सांगूनही तुम्ही काय केलं असतं हो” असं म्हणतो. ते ऐकून रमा चिडून तिथून निघून जाते आणि जाताना त्याला धक्का मारून जाते. त्यावर अक्षयसुद्धा चिडून “अशी काय आहे ही” असं म्हणतो. पुढे प्रोमोमध्ये अक्षय दारू प्यायलेला असून दारूच्या नशेत तो रमाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतो.
रमा-अक्षय पुन्हा येणार एकत्र?
प्रोमोमध्ये पुढे अक्षय लाकडाच्या शिडीवर उभा असून तो दारूच्या नशेत रमाला “आय लव्ह यू” असं म्हणतो आणि तिला किसदेखील करतो. हे सगळं पाहून त्यांची मुलगी आरोही खूप आनंदी होते, त्यामुळे आता ‘मुरांबा’ मालिकेत अखेर रमा व अक्षय एकत्र येणार का की पुन्हा मालिकेत कुठला नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरेल. हा एपिसोड प्रेक्षकांना ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
