Premachi Goshta Likely To Off Air Soon : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सप्टेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेमधून अभिनेत्री तेजश्री प्रधानने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. पहिल्या दिवसांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत कायम टॉप-५ मध्ये असायची. याशिवाय ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा ऑनलाइन टीआरपी सुद्धा चांगला होता.
मात्र, जानेवारी २०२५ मध्ये तेजश्री प्रधानने अचानक ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट घेतली. तिच्या एक्झिटनंतर अभिनेत्रीच्या सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला होता. याबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली, याशिवाय प्रेक्षकही कमेंट्स सेक्शनमध्ये नाराजी व्यक्त करत होते. याचा फटका ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या टीआरपीला बसला.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा टीआरपी कमी झाल्याने ही मालिका फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला साडेसहा वाजता प्रसारित केली जाऊ लागली. मात्र, त्यानंतर या सीरियलचा संध्याकाळचा स्लॉट देखील बदलण्यात आला आणि सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका दुपारी १ वाजता प्रसारित केली जाते. आता लवकरच ही मालिका सर्वांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांच्या नव्या मालिकेची घोषणा केली होती. या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख अन् वेळ नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. समृद्धी केळकरची नवीन मालिका ७ जुलैपासून दुपारी १ वाजता प्रसारित केली जाईल. याच वेळेला सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रक्षेपित केली जाते.

यामुळेच नवी मालिका सुरू होण्यापूर्वी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सर्वांचा निरोप घेईल असा अंदाज व्यक्त केला जात आहेत. चाहत्यांनी अशा कमेंट्स देखील नव्या मालिकेच्या प्रोमोवर केल्या आहेत. तेजश्रीने एक्झिट घेतल्यावर अवघ्या सहा महिन्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सर्वांना निरोप घेणार याची दाट शक्यता आहे. मात्र, वाहिनी किंवा कलाकारांनी यावर अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर तेजश्री प्रधानने एक्झिट घेतल्यावर मुक्ता कोळीच्या प्रमुख भूमिकेसाठी सीरियलमध्ये अभिनेत्री स्वरदा ठिगळेची वर्णी लागली.