मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. तितीक्षा तावडे, पूजा सावंत, शिवानी सुर्वे, योगिता चव्हाण अशा लोकप्रिय अभिनेत्रींनी गेल्या काही दिवसांत लग्नगाठ बांधली. आता यामध्ये आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. जानेवारी महिन्यात साखरपुडा केल्यानंतर आता या अभिनेत्रीने थाटामाटात लग्न केलं आहे. तिच्या विवाहसोहळ्यातील पहिला फोटो नुकताच समोर आला आहे.
‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री स्वरदा ठिगळेचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. अभिनेत्रीच्या नवऱ्याचं नाव सिद्धार्थ राऊत असं आहे. जानेवारी महिन्यात या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. यानंतर अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नाचा फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना लग्न झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
हेही वाचा : ‘तारक मेहता…’ मधील अभिनेत्रीने जिंकला निर्माता असित मोदीविरोधात लैंगिक छळाचा खटला, म्हणाली, “४० दिवस…”
स्वरदाने लग्नात खास मराठमोळा पारंपरिक लूक केला होता. पिवळ्या रंगाची नऊवारी साडी, नाकात नथ, भरजरी दागिने, हातात हिरवा चुडा या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तसेच तिच्या नवऱ्याने यावेळी लाल रंगाचा सदरा परिधान केला होता. सध्या मराठी कलाविश्वातून स्वरदावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर २०१३ मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. २०१७ मध्ये तिने हिंदी मालिकेत काम केलं होतं. याशिवाय ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत स्वरदा प्रमुख भूमिकेत झळकली होती.