Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Actor New Food Outlet : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेली अनेक वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनीसुद्धा आता चाहत्यांच्या मनात आपलं घर तयार केलं आहे. या मालिकेमधील जेठालाल, दया यांसह सर्वच पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. यापैकीच एक आवडीचं पात्र, रोशन सिंह सोढी.’
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील गुरुचरण सिंह हे नाव आजही घराघरात ओळखले जाते. मालिकेत त्यांनी साकारलेले रोशन सिंह सोढी हे पंजाबी पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या गुरुचरण सिंहने आता व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर करीत याबाबत माहिती दिली होती.
अशातच आता गुरुचरण सिंहने एक नवीन व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये खूप गर्दी दिसते. या गर्दीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक गर्दीत उभे असल्याचं दिसत आहेत. या व्हिडीओत एक महिला सांगतेय की, “मित्रांनो, ‘वीर जी मलाई चाप’ हे फूड आउटलेट तिलक नगर, जेल रोडवर सुरू झालं आहे आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे हे आउटलेट आपले ‘सोढी पाजी’ – गुरुचरण सिंह यांनी सुरू केलं आहे. आम्ही इथे पार्टी केली, खूप मजा आली. तुम्हीसुद्धा या आणि सोढी पाजींच्या ‘वीर जी मलाई चाप’ला भेट द्या.”
यानंतर ती महिला गुरुचरण सिंहला बोलावते आणि त्यांचा प्रसिद्ध डायलॉग म्हणण्याची विनंती करते. त्यावर गुरुचरण सिंहदेखील चाहत्यांच्या विनंतीला मान देत मजेशीर अंदाजात “तुम्ही आला नाहीत तर तुम्हाला सोडणार नाही” असं म्हणतो. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे आणि त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना नवीन व्यवसायासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, गुरुचरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांच्याकडे खूशखबर असल्याचं सांगितलं होतं. यावर अनेकांनी ते ‘तारक मेहता…’ मालिकेमध्ये पुन्हा येणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, आता त्यांच्या खूशखबरचं नेमकं कारण समोर आलं आहे. गुरुचरण सिंहनं दिल्लीत ‘वीर जी मलाई चाप’ नावाचं फूड आउटलेट सुरू केलं आहे.
