Shivani Sonar Talks About Husband Ambar Ganpule : शिवानी सोनार मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘तारिणी’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. अशातच शिवानीनं यंदा ती लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करत असल्याचं म्हटलं आहे.

शिवानी व अंबर गणपुळे यांनी जानेवारी २०२५ मध्ये लग्न केलं. तर यंदा ही जोडी पहिल्यांदाच लग्नानंतरची दिवाळी साजरी करीत आहेत. त्यामुळे हा दिवाळी पाडवा त्यांच्यासाठी अर्थात खास असून शिवानीने तिने अंबरकडे खास भेटवस्तू मागितली असल्याचे मुलाखतीतून सांगितले आहे. शिवानीने ‘टेलीगप्पा’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे.

शिवानी सोनारची पहिल्या दिवाळी पाडव्याबद्दल प्रतिक्रिया

मुलाखतीत शिवानी लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीबद्दल म्हणाली, “लग्नानंतरची माझी पहिलीच दिवाळी आहे. मला छान वाटतंय की, नवीन घरात सगळ्यांबरोबर असणार आहे; पण या वेळेस आई-बाबा आणि भावाला दिवाळीला जास्त मिस करेन. त्यामुळे घरची आठवणही येत आहे. पण, भाऊबीजेला त्याला भेटेनच.” पहिल्या पाडव्याबद्दल शिवानी म्हणाली, “मी अंबरला आधीच सांगून ठेवलंय की पहिला पाडवा आहे, तर जरा काहीतरी खास सरप्राइज दे.”

शिवानीने पुढे यावेळी दिवाळी पाडव्याबरोबर तिच्यासाठी भाऊबीजही तितकीच खास असणार असल्याचे म्हटले आहे. त्याबद्दल ती म्हणाली, “माझा भाऊ इतकी वर्ष शिकत होता. हे पहिलं वर्ष आहे जेव्हा तो स्वत: कमवायला लागलाय आणि तो आता बंगळुरूला असतो. हे पहिलं वर्ष आहे, जिथे तो त्याच्या हक्काच्या कमाईनं मला भेटवस्तू देणार आहे. इतकी वर्षं मीच त्याला सगळं पुरवायचे; पण आता तसं नाहीये. आता मी हक्कानं त्याच्याकडे मागणार आहे. माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.”

शिवानी पुढे दिवाळीच्या आठवणी सांगत म्हणाली, “मी किल्ला बनवणं खूप मिस करते. कारण- आम्ही किल्ला बनवायचो. त्याच्यासाठी खूप तयारी करायचो. पण, आता इतकं शूटिंग असतं की, लवकर जाऊन किल्ला बनवता येत नाही.”