Tejashri Pradhan Diwali Celebration : प्रकाश, आनंद आणि आठवणींनी भरलेला सण म्हणजे ‘दिवाळी’. या निमित्ताने सगळीकडे उजळून निघालेलं वातावरण, फराळाच्या चविष्ट पंगती, कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यामधील गोडवा यामुळे हा सण सर्वांसाठी खास ठरतो. सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार सुद्धा शूटिंगमधून ब्रेक घेत आपल्या कुटुंबीयांसह दिवाळी साजरी करण्यासाठी स्वगृही परतले आहेत.
मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने सुद्धा दिवाळीनिमित्त काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी एका खास अभिनेत्यांच्या घरी गेल्याचं पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री दिवाळीनिमित्त मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या घरी पोहोचली होती. या दोघांबरोबर तेजश्रीने यंदाची दिवाळी साजरी केली आहे. या फोटोमध्ये तेजश्रीने गडद गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस घातल्याचं पाहायला मिळत आहे. तर, निवेदिता यांनी गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती.
निवेदिता व अशोक सराफ यांच्याबरोबरचा खास फोटो तेजश्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. माझी दिवाळी यंदा माझ्या खास माणसांबरोबर साजरी झाली असं कॅप्शन तेजश्रीने या फोटोला दिलं आहे. याशिवाय अशोक-निवेदिता यांच्या घरातील श्वान; ज्याचं नाव ठेवलंय सनी सराफ, त्याचीही झलक या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय.
दिवाळीतील फटाके आणि फराळाच्या संदर्भात बोलताना तेजश्री म्हणाली, “मला वाटतं मी फुलबाजीसारखी आहे. ती ‘तडतड’ आवाज करत प्रकाश देते, पण त्याचवेळी शांततेची अनुभूतीही देते.” तर, फराळाच्या पदार्थांबाबत विचारल्यावर तेजश्रीने म्हणते, “माझ्यामते, मी चिवड्यासारखी आहे. बाकीच्या फराळाच्या पदार्थांपेक्षा चिवडा थोडा हेल्दी असतो आणि त्यात बऱ्याच गोष्टींचं मिश्रण असतं. मी प्रत्येक दिवाळी कुटुंब आणि मित्रमंडळींसह साजरी केली आहे. दिवाळीत एक खास परंपरा आवर्जून जपते ती म्हणजे घरासमोर खूप सारे दिवे लावणं आणि सर्वत्र प्रकाश व आनंद पसरवणं.”

दरम्यान, तेजश्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ती ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्यासह या मालिकेत अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिका साकारत आहे.