‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत लवकरच समर-स्वानंदीचा भव्यदिव्य विवाहसोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठी टेलीव्हिजनवरील हा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे सगळेजण हा लग्नसोहळा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. याबद्दल मालिकेत स्वानंदी ही प्रमुख भूमिका साकारणाऱ्या तेजश्री प्रधानने भावना व्यक्त केल्या आहेत.

तेजश्री म्हणाली, “या विवाहसोहळ्याचं शूटिंग करण्यासाठी आम्ही सगळे गोव्याला गेलो होतो. यादरम्यान मी खूप जास्त एन्जॉय केलं तिथे मासे खाऊन…तिथल्या शूटिंगची सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट सांगायची झाली तर ४०-४४ डिग्री तापमानात समुद्रकिनारी आम्ही शूट पूर्ण केलं. इतक्या उष्ण वातावरणात वेडिंग लूक सांभाळणं, कपडे, दागिने, मेकअपची काळजी घेणं आणि त्या सगळ्यात भावनांवर नियंत्रण ठेवणं हे खरंच कठीण होतं. पण, तरीही आम्ही सगळ्यांनी हा अनुभव मनापासून एन्जॉय केला. लोकेशन इतकं सुंदर होतं की, सूर्य मावळताना हवामान थंड, आल्हाददायक असायचं. ते वातावरण पाहून माझा थकवा पूर्ण गायब व्हायचा. मग आम्ही सगळे सूर्यास्ताचा मस्त आनंद घ्यायचो.”

तेजश्री पुढे म्हणाली, “आमच्या लूकबद्दल सांगायचं झालं, तर हळदी आणि वेडिंग लूक दोन्ही खूप खास होते. दोन्ही तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली. राजवाडे कुटुंब हे समाजातील एक प्रतिष्ठित घराणं म्हणून दाखवलं जातंय, त्यामुळे त्यांच्या स्टेटसला साजेसं सगळं होतं. प्रत्येक गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं गेलं. फक्त वधू नव्हे, तर वराचाही लूक तितकाच शाही ठेवण्यात आला. ‘आधिरा’ आणि ‘स्वानंदी’ या दोघींचा वेगळा स्वभाव लक्षात घेऊन त्यांचे लूक डिझाईन करण्यात आले आहेत.”

“मराठी टेलिव्हिजनवरील हे पहिलंच डेस्टिनेशन वेडिंग आहे असं म्हटलं जात आहे आणि पहिल्यांदा असलेली गोष्ट नेहमी खास असते. या सर्वाचं श्रेय निर्मात्यांना जातं. आम्ही कलाकार म्हणून फक्त ठरवलेला मार्ग अनुसरतो, पण आमचं सर्वकाही व्यवस्थित पार पडावं म्हणून प्रोड्युसरनी प्रत्येक गोष्टीची उत्तम काळजी घेतली. फ्लाइट, लोकेशन, राहण्याची सोय, हॉटेल सगळं काही अप्रतिम होतं. टीव्ही मालिका असल्यामुळे कुठेही तडजोड झाली नाही, हे कौतुकास्पद आहे. निर्माते कधीही लाईमलाईटमध्ये नसतात, पण त्यांच्या परिश्रमामुळेच हा टप्पा गाठता आला. आम्हा सर्वांना याचा अभिमान आहे कारण, आम्ही पहिले आहोत, असं सांगणं हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. असेच सुवर्णक्षण छोट्या पडद्यावर पुन्हा-पुन्हा यावे हीच इच्छा.” असं तेजश्रीने सांगितलं.