Tejasswi Prakash Say’s She Can Go Bald For A Role : तेजस्वी प्रकाश हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने हिंदीसह मराठीतही काम केलं आहे. अशातच आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत भूमिकेसाठी तिची काहीही करण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे.
तेजस्वी प्रकाश कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. हिंदीत अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. अशातच आता तिने नुकतीच ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे. यामध्ये तिला टक्कल करण्याबद्दल विचाण्यात आलेलं. यावर ती म्हणाली, “हो मी करू शकते.”
नेमकं काय म्हणाली तेजस्वी प्रकाश?
अभिनेत्री पुढे याबद्दल म्हणाली, “जर एखाद्या भूमिकेसाठी गरज भासली तर मी टक्कलदेखील करायला तयार आहे. मी अशा गोष्टींसाठी तयार असते. सध्या लोकांनी त्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढले आहेत. मी अशा काही गोष्टी करत आहे, ज्या ट्रान्सफॉर्मेशनशी संबंधित आहेत. पण, इंडस्ट्रीत सगळ्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी इतक्या वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतलाय, मग ते केसांचा रंग वेगळा दाखवायचा असो, टक्कल दाखवायचं असो किंवा सोनेरी रंगाचे केस दाखवायचे असो. पण, अजूनतरी प्रत्यक्षात कोणी मला हे करायला सांगितलं नाही; पण कधी जर सांगितलं तर मी नक्कीच ते करेन.”
तेजस्वी प्रकाश हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा असून तिने आजवर ‘स्वरागिनी’, ‘रिश्ते लिखेंगे हम नये’, ‘सिलसिले बदलते रिश्तों का’, ‘थपकी प्यार की’, ‘कसम’, ‘पेहरेदार पिया की’, ‘संस्कार’, ‘कर्ण संगीनी’, ‘ससुराल सिमर का’, ‘नागीन ६’, ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’, ‘खतरो के खिलाडी’, ‘बिग बॉस’ यांसारख्या मालिकांमध्ये व रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. तेजस्वी प्रकाशने मराठीतही काम केलं आहे तिने ‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’, ‘मन कस्तुरी’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे.
दरम्यान, तेजस्वी प्रकाशच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती अभिनेता करण कुंद्रासह रिलेशनशिपमध्ये आहे. ‘बिग बॉस’च्या घरात या दोघांचे सुर जुळले होते. दोघेही एकाच पर्वात सहभागी झाले होते, तर तेजस्वी त्या पर्वाची विजेती ठरली होती.