Tejaswini Lonari Talks About Late Actress Priya Marathe : प्रिया मराठे मराठी इंडस्ट्रीतील हरहुन्नरी अभिनेत्री होती. तिने आजवर नाटक, मालिकांमध्ये तिच्या सहज सुंदर अभिनयाने अनेकांची मनं जिंकली. मराठीसह हिंदीतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या. परंतु, काही दिवसांपूर्वी तिचं दुर्दैवी निधन झालं. अशातच आता अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने तिच्याबद्दल सांगितलं आहे.
प्रियाला कर्करोगाचं निदान झालेलं आणि ती गेली अनेक दिवस कर्करोगाशी झुंजत होती. त्यादरम्यान तिने मालिका, नाटकांतही काम सुरूच ठेवलं. ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मोनिका ही भूमिका साकारत असताना तिने तिच्या आजारपणामुळे या मालिकेतून एक्झिट घेतली. त्यानंतर तिच्या जागी या मालिकेत अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने मोनिका ही भूमिका साकारली. अशातच आता तेजस्विनीने याबद्दल सांगितलं आहे.
तेजस्विनीने ‘सकाळ’ला मुलाखत दिली असून यामध्ये तिने प्रियाबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने मालिकेत प्रियाला रिप्लेस करणं तिच्यासाठी कठीण होतं असं म्हटलं आहे. यावेळी तिला, “प्रियाला आपण गमावलेलं आहे. उत्कृष्ट अभिनेत्री होती ती. तिने आरोग्याच्या कारणांमुळे मालिका सोडल्यानंतर तू उत्तमपणे ती भूमिका साकारलीस, तुला काय वाटलं होतं; कारण ती बातमी आल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला होता”, असा प्रश्न विचारला होता.
तेजस्विनी याबद्दल म्हणाली, “मला आता पण अंगावर शहारे आले, कारण जेव्हा तिला रिप्लेस करायचं होतं तेव्हा मी आधी त्यांना विचारलेलं की काय कारण आहे सांगा, कारण रिप्लेसमेंट होती तर त्यांना मला कारण सांगणं भाग होतं. तेव्हा माझं तिच्याशी बोलणं झालेलं. तेव्हा मालिकेच्या मेकर्सनेही मला कारण सांगितलं. पण, असं काही होईल हे मला वाटलं नव्हतं; कारण तिने छान कमबॅक केलेलं. परदेशात जाऊन तिने महिनाभर नाटकाचा दौरा केला. नंतर पुन्हा एका मालिकेत काम केलं. आम्ही फोनवर कधीतरी भेटू आपण असं बोलायचो. खूप सुंदर व्यकिती होती ती.”
तेजस्विनीला पुढे प्रियाने तुला काही प्रतिक्रिया दिली का, तुझ्या भूमिकेबद्दल असं विचारलं असताना ती म्हणाली, “माझी हिंमतच झाली नाही तिला काही विचारायची, कारण ती खूप उत्तम अभिनेत्री आहे. तिने नाटकांमध्ये काम केलं आहे, त्यामुळे माझी विचारण्याची हिंमत झाली नाही. मला पहिला महिना खूप दडपण होतं, कारण तिला रिप्लेस करणं कठीण होतं. तिचं मराठी, तिची बोलण्याची पद्धत, तिची त्या पात्रावरची पकड खूप छान होती, त्यामुळे याबद्दल काही विचारलच नाही; म्हटलं नको, आपण आपलं आपलं काम करूयात.”
प्रियाच्या निधनाबद्दल तेजस्विनी म्हणाली, “मला पण वाईट वाटलं. मला तिच्या अंतिम दर्शनासाठी नाही जाता आलं, कारण माझी प्रकृती खराब होती. इतकी तरुण असतानाही असं काही होणं विचारही करवत नाही.”
