Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्योती चांदेकर अडीच वर्षांपासून ‘ठरलं तर मग’ या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. मालिकेच्या सेटवर अनेकदा त्यांची प्रकृती बिघडायची. पण, त्या शेवटपर्यंत काम करत राहिल्या. सेटवरच्या सगळ्या कलाकारांबरोबर ज्योती चांदेकर यांचं खूप छान बॉण्डिंग होतं. तेजस्विनी नुकतीच लोकशाही मराठीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी आईबद्दल बोलताना अभिनेत्री भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

तेजस्विनी म्हणाली, “आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा…तुमचे आई-वडील हयात असतील तेव्हाच त्यांच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करा. मला आणि माझ्या बहिणीला आईसाठी खूप काही करायचं होतं. आमचे वडील गेले तेव्हाही त्यांच्यासाठी मला अनेक गोष्टी करायच्या होत्या…त्या सगळ्या गोष्टी राहून गेल्या. त्यामुळे माझं आणि माझ्या बहिणीचं असं झालं होतं की, आईसाठी तरी सगळं काही करायचं. पण, आई १६ ऑगस्टला आम्हाला सोडून गेली… खरंतर, पंधरा दिवसांनी म्हणजेच ३१ ऑगस्टला तिचा वाढदिवस होता. त्यादिवशी आम्ही तिच्यावरचं एक पुस्तक प्रकाशित करणार होतो. पण, अचानक ३ दिवसांत सगळ्या गोष्टी बदलल्या. १२ तारखेला तिला रुग्णालयात दाखल केलं होतं. आईला थंडी वाजून ताप आला आणि तेवढंच कारण ठरलं. त्यानंतर, तीन दिवसांनी ती आम्हाला कायमची सोडून गेली…मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगेन, तुम्ही तुमच्या आईबरोबर परिवाराबरोबर काही गोष्टी ठरवल्या असतील तर त्या प्लीज करून टाका. कारण, खरंच आयुष्याचा काहीच नेम नाही.”

“आईने इंडस्ट्रीत ५० वर्षांहून अधिक काळ काम केलं. नाटकापासून तिचा प्रवास झाला होता. नाटक, सिनेमा आता मालिका सगळ्या माध्यमांमध्ये तिने मनापासून काम केलं होतं. आईने ज्या-ज्या माध्यमांमध्ये काम केलं त्या-त्या वर्षीचे सगळे पुरस्कार घरात असायचे. तिच्या पोटी जन्माला येणं हे मी माझं अहोभाग्य समजते. तिचं हे कार्य मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन.” असं तेजस्विनी पंडितने यावेळी सांगितलं.

दरम्यान, “आईची पुस्तक प्रकाशनाची इच्छा नक्की पूर्ण करणार” असं तेजस्विनीने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये देखील म्हटलं होतं. ज्योती चांदेकर-पंडित आणि तेजस्विनी पंडित या मायलेकींनी ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटादरम्यान एकत्र काम केलं होतं. या सिनेमासह ज्योती चांदेकर यांनी ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण साकारल्या होत्या.