Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अश्विनच्या वाढदिवसासाठी सुभेदार कुटुंबीय खास तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस मालिकेत प्रेक्षकांना कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळाला होता. भर कोर्टात अर्जुन प्रियाला तोंडावर पाडतो, तिच्याविरोधातील अनेक पुरावे कोर्टात सादर करतो. यामुळे प्रिया अर्जुनवर प्रचंड संतापते.

कोर्टातून घरी आल्यावर अर्जुन-सायली आणि प्रियामध्ये वाद होतात. इतकं सगळं होऊनही अश्विनचा अजूनही आपल्या बायकोवर विश्वास असतो. आता काही करून प्रियाचा खरा चेहरा घरच्यांसमोर उघड करायचा असा निश्चय सायली करते. इतक्यात तिच्या लक्षात येतं की, अश्विनचा वाढदिवस आहे आणि त्याला बाहेरचा केक आवडत नाही. त्यामुळे सायली-अर्जुन दोघं मिळून अश्विनसाठी रवा केक बनवायला घेतात. कल्पना आणि प्रताप सुद्धा यावेळी किचनमध्ये उपस्थित असतात.

दुसरीकडे, प्रिया स्वत:च्या नवऱ्याचा वाढदिवस विसरलेली असते. सायली-अर्जुन मोठ्या प्रेमाने अश्विनच्या वाढदिवसानिमित्त सजावट करतात, त्याच्यासाठी केक बनवतात. अश्विन यावेळी भावाला म्हणतो, “कशाला आता भांडण उखरून काढतोय?” यावर अर्जुन त्याला सांगतो, “भांडण आता सुरू होणार…” आता चांगल्या दिवशी घरात वाद होणार, दोन्ही भाऊ पुन्हा भांडणार असं वाटत असतानाच अर्जुन पुढे म्हणतो, “भांडण होणार कारण, तुझा केक मी संपवणार”

यानंतर अर्जुन-अश्विन रव्याच्या केकवरून एकमेकांशी हसत-खेळत बोलू लागतात. गेल्या काही दिवसांपासून प्रियामुळे दोघेही एकमेकांचं तोंड पाहत नव्हते. पण, या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन भावांमध्ये दिलजमाई होणार आहे.

या घडामोडी सुरू असताना मिसेस सायली सुभेदार एक चॅलेंज स्वीकारणार आहेत. सायली अर्जुनला सांगते, “कोणाचाही हिरमोड न करता मी प्रियाला आता बरोबर धडा शिकवणार आहे…पुरावे सुद्धा मिळतील, फक्त थोडी वाट पाहा. प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार हिचा मुखवटा मी कसा फाडते हे बघाच…”

सायली यानंतर सासूबाई कल्पनाच्या मदतीने अश्विनच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवणार आहे. जेवताना आवडीचा मेन्यू पाहून अश्विन प्रचंड खूश होतो. पण, प्रिया सायलीचं सगळं क्रेडिट घेणार असते. इतक्या पूर्णा आजी हे सगळं जेवण सायली आणि कल्पनाने बनवलेलं असल्याचं अश्विनला सांगते.

दरम्यान, आता सायली घरच्या घरी प्रियाला कसा धडा शिकवणार हे ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केली जाते.