Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आपल्या बायकोच्या म्हणजेच सायलीच्या खऱ्या आई-बाबांचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायली ही रविराज किल्लेदारांची मुलगी असल्याचं सत्य मधुभाऊंना समजलेलं असतं. यानंतर नागराज त्यांच्यावर हल्ला करतो आणि ते कोमात जातात. पण, यादरम्यान मधुभाऊ सायलीचे खरे आई-बाबा जिवंत असल्याची मोठी हिंट अर्जुनला देतात.
सायली किल्लेदारांची खरी मुलगी तन्वी आहे हे सत्य मधुभाऊंना जावयाला सांगायचं असतं. पण, त्यांची शुद्ध हरपते. यानंतर आता काही करून आपल्या बायकोच्या पालकांना शोधून काढायचं असं अर्जुन ठरवतो. दुसरीकडे, नागराज आणि महिपत हे दोघे मिळून प्रियाला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा तिचा भूतकाळ समोर आणतात.
प्रिया ही अतिशय सर्वसाधारण घरातील मुलगी असते. तिचे आई-बाबा टेलरिंगचं काम करून उदरनिर्वाह करत असतात. यामुळे काही करून हे सत्य अर्जुनला समजता कामा नये यासाठी प्रिया खूप प्रयत्न करत असते. यादरम्यान, अर्जुनचा मोठा गैरसमज होणार आहे.
सायलीच्या बालपणीच्या वस्तू प्रियाने आधीच लपवलेल्या असतात. कारण, तिला खरी तन्वी होऊन सर्वत्र मिरवायचं असतं. यामुळेच अर्जुनचा मोठा गैरसमज होणार आहे. प्रियाचे आई-बाबा सदाशिव व श्रद्धा लोखंडे हे सायलीचे पालक असावेत असा समज तो करून घेणार आहे. इतकंच नव्हे तर, अर्जुन या दोघांना मोठ्या आनंदाने सुभेदारांच्या घरी घेऊन येतो आणि हेच सायलीचे खरे आई-बाबा आहेत असं सर्वांना सांगतो.
अर्जुन इतक्या वर्षांनी आपल्या आई-बाबांना घेऊन आलाय हे पाहताच सायलीला धक्का बसतो. तर, प्रिया देखील खूप घाबरते. कारण, सदाशिव-श्रद्धामुळे तिची खरी ओळख जगासमोर येईल अशी भीती तिला वाटत असते.
आता सायली सदाशिव-श्रद्धा या दोघांचा आई-बाबा म्हणून खरंच स्वीकार करेल का? तिला भूतकाळ आठवणार की नाही? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना १३ ते १५ ऑक्टोबर यादरम्यान रात्री ८:३० वाजता ‘ठरलं तर मग’ मालिकेत मिळतील.
दरम्यान, या प्रोमोच्या कमेंट्समध्ये काही नेटकऱ्यांनी आता प्रिया तिच्या खऱ्या आईबरोबर हातमिळवणी करून हे नाटक असंच सुरू ठेवेल आणि सुभेदारांना लुटलं जाईल असा अंदाज देखील वर्तवला आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.